मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST2021-06-22T04:23:17+5:302021-06-22T04:23:17+5:30
कडा : पोलिसांना खबर देतो असे म्हणून २८ एप्रिल रोजी रात्री एक ते दीडच्या सुमारास तिघांनी मिळून कोयता, ...

मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात उघड
कडा : पोलिसांना खबर देतो असे म्हणून २८ एप्रिल रोजी रात्री एक ते दीडच्या सुमारास तिघांनी मिळून कोयता, कुऱ्हाड व दगडाने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पारधी समाजातील नवनाथ अभिवचन काळे (६०) याचा उपचार घेऊन घरी येताच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाल्याने तिघांवर दाखल गुन्ह्यात खून केल्याचे कलम वाढवले असल्याची माहिती तपासाधिकारी सहायक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांनी दिली.
वाकी येथील नवनाथ अभिवचन काळे यांना २८ एप्रिल रोजी घराच्या समोरील पडवीत झोपले असता त्याचेच पाहुणे असलेल्या काही लोकांनी आमची पोलिसांना खबर देतो का, या कारणावरून मारहाण करीत कोयता, कुऱ्हाडीने, दगडाने गंभीर जखमी केले होते. आष्टी पोलिस ठाण्यात मारहाण प्रकरणी १८ मे रोजी नवनाथ काळेची पत्नी ढकूबाई नवनाथ काळे हिच्या फिर्यादीवरून आरोपी कुलदीप हनुमंत काळे, नटू मिनिनाथ काळे, गोट्या माहाश्या भोसले यांच्यावर कलम ३०७ नुसार प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतल्यावर आठ दिवसांनी नवनाथचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली होती. आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पण मृत्यू नेमका कशाने झाला याचा अहवाल येणे बाकी होते. मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच आधी दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम वाढविण्यात आले आहे. आरोपी कुलदीप हनुमंत काळे याला टाकळसिंग परिसरातून अटक केली. अन्य दोन फरार आरोपींचा आष्टी पोलिस शोध घेत आहेत.