बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या या बंदमध्ये सर्वच समाजांनी आणि राजकीय, सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदविला. बीडसह इतर शहरांमध्ये सकाळी रॅली काढण्यात आली. तसेच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवले. शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवली होती. दिवसभरात हा बंद शांततेत पाळला होता. दरम्यान, या प्रकरणात आरोप असलेले केजचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यांचा अतिरिक्त पदभार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. आज ते पदभार स्विकारणार आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याच्यासह सातजणांचा सहभाग आढळला आहे. यातील तीन आरोपी पोलिसांनी पकडले आहेत. परंतु चार आरोपी अजूनही मोकाटच आहेत. तसेच या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना निलंबितही करण्यात आले होते. असे असले तरी या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच घटनेच्या निषेधार्थ आणि या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करावी, या प्रकरणाचा मागचा मास्टरमाईंड शोधावा, यातील आरोपींना कठोर शासन करावे, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे यांसारख्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. याला जिल्ह्यात सर्वत्र प्रतिसाद मिळाला.
नागरिकांतील वाढता रोष पाहून आणि आंदोलकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. आता केजची जबाबदारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. मुळचे काेल्हापुरचे रहिवाशी असलेल्या पाटील यांनी सीआयडी पुणे, अकोला आदी ठिकाणी कर्तव्य बजावलेले आहे.