विवाह, सत्यनारायणापासून मुंज, तेराव्यापर्यंत ऑफलाईनलाच प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:37+5:302021-06-23T04:22:37+5:30
परंपरेला फाटा : संक्रमण कमी झाल्याने प्रत्यक्ष पूजा-अर्चा अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : कोरोनामुळे विवाह, साखरपुडा तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी शासनाने ...

विवाह, सत्यनारायणापासून मुंज, तेराव्यापर्यंत ऑफलाईनलाच प्राधान्य
परंपरेला फाटा : संक्रमण कमी झाल्याने प्रत्यक्ष पूजा-अर्चा
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : कोरोनामुळे विवाह, साखरपुडा तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी शासनाने निर्बंध घातले आहेत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच कार्यक्रम उरकण्यात येत आहेत. वास्तविक ८० ते ९० टक्के कार्यक्रम बंदच आहेत. दूरच्या ठिकाणी असलेल्या असलेल्या उभयतांसाठी साखरपुडा, विवाह ऑनलाईन आयोजित केला जात आहे. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने प्रत्यक्ष पूजा अर्चा केली जात आहे.
स्थानिकांमध्येही अनेकांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विवाह सोहळे रद्द केले आहेत. मात्र, ठराविक लग्न सोहळे आयोजित केले जात असले तरी उपस्थितीची मर्यादा पाळण्यात येत आहे. शिवाय मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिंग राखले जात आहे. मंदिरे बंद असल्यामुळे लघुरूद्र, अभिषेक,विविध आवर्तने आदी धार्मिक पूजाविधी बंदच आहेत. श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली जात असली तरी महाप्रसाद ठेवला जात नाही. पूजेला नमस्कार करण्यासाठीही सहसा लोकांना बोलावले जात नाही. घरातील मंडळींमध्येच कार्यक्रम उरकण्यावर भर आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे गर्दी टाळली जात आहे. वास्तू शांती, गणेशपूजन,विविध यज्ञ तर सध्या बंदच आहेत.
मृत व्यक्तीचे दहावे, बारावे व तेरावे भटजींना बोलावून उरकण्यात येत असले तरी अगदी जवळच्या नातेवाईकांशिवाय अन्य कोणालाही बोलावणे टाळले जात आहे. गेल्या दीड वर्षापासून धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने पुरोहित मंडळीना म्हणावे तसे काम राहिले नाही.
या वर्षी पितृपक्षातील पंधरवड्यावरही कोरोनाचे सावट होते. एरवी तलाव, नदी किंवा पवित्र स्थळी होणारा पिंडदानाचा कार्यक्रम यंदा घरगुती स्वरूपातच केला जात आहे. लोकांनी ऑनलाईन पूजेला जास्त प्राधान्य दिले नाही. घरातच कमी लोकांत श्राद्धविधी करून लोकांनी कोरोनाकाळात बाहेर पडणे टाळले. तर कोरोनाबाधितांच्या मृत्यूनंतरचे विधी एकत्र न येता ऑनलाईन पद्धतीनेच केवळ पुजारी वा महाराज ठरवून करण्यात आले. बीड जिल्ह्यात पितृपक्षामध्ये श्राद्ध विधींसाठी बुकिंग, वेगवेगळ्या दिवसांसाठीच्या श्राद्ध विधींसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन ब्राह्मण बुक करणे, वर्षश्राद्ध, श्राद्धविधी, भरणी श्राद्ध, सर्वपित्री अमावास्या असे विधी ऑनलाईन करण्याकडे अनेकांचा कल राहिला.
कोरोना कमी झाल्याने प्रत्यक्ष पूजा
या पंधरवड्यापासून कोरोनाचा कहर कमी झाल्याने आता प्रत्यक्ष स्थळावर, मंदिर, पूजास्थळी जाऊन पूजा घातली जात आहे. त्यामुळे ऑनलाईन विधीला तूर्तास ब्रेक लागला आहे.
पूजेला आले तरी मास्क
पूजेला आले तरी सर्व पुजाऱ्यांच्या चेहऱ्याला मास्क अनिवार्य आहे." एखाद्या पुजाऱ्याने चेहऱ्यावर मास्क घातला नसेल, तर यजमानांकडून तशी सूचनावजा विनंती केली जाते. मास्क नसेलच तरी तोंडावर दुपट्टा बांधण्याचा आग्रह केला जातो.
काय म्हणतात विधी करणारे?
लग्नस्थळी प्रत्यक्षात जाऊन विधी केले. मात्र, वर-वधू व त्यांच्या मामांशिवाय तेथे गर्दीला थारा नव्हता. दीड वर्षापासून मास्कचे बंधन स्वत:लाच घालून दिले. अंबाजोगाई शहरात ऑनलाईन विधीला मर्यादा होत्या. -आचार्य मिलिंद कऱ्हाडे
पुरोहित,अंबाजोगाई.
ऑनलाईन असो वा ऑफलाईन, पूजाविधीला मास्क बंधनकारकच होता. ऑनलाईन पूजेला मर्यादा येतात. आता फिजिकल डिस्टन्सिंग राखून ऑफलाईन पूजेला सुरुवात झाली आहे. - महेश जोशी, पुरोहित,बीड.