नियमबाह्य कोरोना चाचण्यांचा लॅबवाल्यांकडून बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:25 IST2021-05-29T04:25:56+5:302021-05-29T04:25:56+5:30

कडा : आरोग्य विभागाच्या परवानगीविना राजरोस लॅबमध्येच अँटिजन चाचण्या केल्या जात आहेत. तालुका आरोग्याधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी डमी ...

Marketing of unregulated corona tests by labs | नियमबाह्य कोरोना चाचण्यांचा लॅबवाल्यांकडून बाजार

नियमबाह्य कोरोना चाचण्यांचा लॅबवाल्यांकडून बाजार

कडा : आरोग्य विभागाच्या परवानगीविना राजरोस लॅबमध्येच अँटिजन चाचण्या केल्या जात आहेत. तालुका आरोग्याधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी डमी ग्राहक पाठवून एका लॅबमधील नियमबाह्य चाचणीचा प्रकार गुरुवारी आष्टी तालुक्यातील धानोरा येथे समोर आणला.

खासगी लॅबआडून अँटिजन चाचण्यांचा बाजार सुरू असल्याचे यामुळे चव्हाट्यावर आले.

कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांची लॅबमध्ये अँटिजन चाचणी केली जाते. तपासणीसाठी तीनशे ते पाचशे रुपये घेतले जातात. मात्र, तपासणीच नियमबाह्य असल्याने पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतरही त्याची माहिती आरोग्य विभागाला कळविली जात नाही. यामुळे कोरोनाबाधितांची नोंदही होत नाही. येथे एका लॅब चालकाकडून अँटिजन चाचणी नियमबाह्यपणे केली जात असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. नितीन मोरे यांना कळली होती. त्यानुसार त्यांनी नोडल अधिकारी डॉ. प्रसाद वाघ यांना सोबत घेऊन गुरुवारी एक डमी ग्राहक पाठविला. अँटिजन चाचणी करायची आहे, असे सांगितल्यावर लॅबचालकाने तयारी दर्शविली. डमी ग्राहकाने इशारा करताच आरोग्य विभागाचे अधिकारी तेथे धडकले. बेकायदेशीर अँटिजन चाचण्या होत असल्याने निष्पन्न झाल्याने आष्टी तालुक्यातील धानोरा येथील गजानन पॅथॉलॉजी लॅबच्या मालकास नोटीस बजावली आहे.

जिल्हाभर कारवाई होणे गरजेचे

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. मात्र, आतापर्यंत आरोग्य प्रशासन व्यस्त होते. याचा गैरफायदा घेत काही लॅबचालकांनी राजरोस अँटिजन चाचण्या करून पैसे उकळण्याचा धंदा सुरू केला होता. आष्टीप्रमाणे इतर ठिकाणीही कारवाया होणे अपेक्षित आहे.

.....

...तर आरोग्य विभागाला माहिती द्या

आरोग्य विभागाची परवानगी नसलेल्या लॅबवर कोरोना चाचण्या करू नयेत. यासाठी नागरिकांनी दक्ष राहून विनापरवाना चाचण्या होत असतील तर याची माहिती द्यावी, असे तालुका आरोग्याधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Marketing of unregulated corona tests by labs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.