बाजारातील कोंडीवर उपाय हवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:03+5:302021-07-21T04:23:03+5:30
स्थानकात अस्वच्छता; आरोग्य धोक्यात अंबाजोगाई : येथील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानकाच्या परिसरात ...

बाजारातील कोंडीवर उपाय हवेत
स्थानकात अस्वच्छता; आरोग्य धोक्यात
अंबाजोगाई : येथील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानकाच्या परिसरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. तसेच मोकाट जनावरांचा प्रादुर्भावही बसस्थानकात मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
लघु व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न गंभीर
केज : शहरात रस्त्याच्या दुतर्फा बसून लहान-मोठा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला ज्यांच्या मालकीच्या जागा आहेत, त्यांच्या मर्जीनुसार भाडे देऊन जागा किरायाने घ्यावी लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कामासाठी रस्त्याचे खोदकाम केल्याने अनेकांवर त्यांचे व्यवसाय जागेअभावी बंद करण्याची वेळ आली आहे.
व्यवसायासाठी नियमांची मोडतोड
बीड : हॉटेल व्यावसायिकांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मध्यभागी दुभाजक तोडले आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा
बीड : पाटोदा तालुक्यातील सौताडा, धनगर जवळका परिसरात गेल्या चार दिवसांत काही ठिकाणी भीज पाऊस झाला, तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. खरिपाच्या पेरणीनंतर पावसाने १५ दिवस दडी मारली होती. दरम्यान, गेल्या चार-पाच दिवसांत चांगला पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
डांबरीकरण उखडल्याने रस्त्यावर खड्डे
अंबाजोगाई : आठ महिन्यांपूर्वीच राडी ते मुडेगाव या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. शासनाने लाखो रुपये खर्च करून या रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, काम करणाऱ्या कंत्राटदाराने या मुख्य रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा रस्ता कंत्राटदारांच्या माध्यमातून पुन्हा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.