मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुष्पहार स्वीकारणार नाही, तर ओबीसीला न्याय मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:39 IST2021-08-17T04:39:28+5:302021-08-17T04:39:28+5:30
बीड : भाजप सरकारने दिलेले मराठा आरक्षण आघाडी सरकारला टिकवता आले नाही, तर ओबीसीचे पारंपरिक राजकीय आरक्षण देखील या ...

मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुष्पहार स्वीकारणार नाही, तर ओबीसीला न्याय मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही
बीड : भाजप सरकारने दिलेले मराठा आरक्षण आघाडी सरकारला टिकवता आले नाही, तर ओबीसीचे पारंपरिक राजकीय आरक्षण देखील या सरकारने घालविले. आगामी काळात या दोन्ही समाजाला न्याय मिळविण्यासाठी बीड जिल्ह्यातून संघर्ष उभा करणार असून, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी पुष्पहार स्वीकारणार नाही, तर ओ.बी.सी.चे आरक्षण पुन्हा कायम झाल्याशिवाय फेटा बांधणार नाही, अशी प्रतिज्ञा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली.
सोमवारी बीड येथे भाजपच्या एक दिवसीय कार्यकारिणी बैठक व डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियान कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. या बैठकीत खा.डॉ. प्रीतम मुंडे या उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या, तर मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा, माजी आ. आर. टी. देशमुख, आदिनाथराव नवले, केशवराव आंधळे, रमेशराव आडसकर, मोहनराव जगताप, ॲड. सर्जेराव तांदळे, सविता गोल्हार, आदी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, सत्ता असताना आपण विकासावर लक्ष केंद्रित केले. आज सत्ता नसताना पक्ष संघटन, विस्तारावर आपण लक्ष दिले पाहिजे. भाजपसाठी हा काळ पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. कार्यकर्त्यांनी आपली निष्ठा बाटू देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खा. प्रीतम मुंडे यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले. संघटन मंत्री भाऊराव देशमुख यांनी बूथ रचनेचा आढावा घेतला. दुसऱ्या सत्रात कार्यकारिणीची सभा झाली. यात मराठा आरक्षणाला समर्थन देणारा ठराव रमेशराव आडसकर यांनी मांडला व ओ.बी.सी. आरक्षणाला समर्थन देणारा ठराव आ. नमिता मुंदडा यांनी मांडला. तसेच बीड जिल्ह्याचा भाजप सरकार काळातील झालेला विकास आणि आज खुंटलेला विकास यावर आ. सुरेश धस यांनी ठराव मांडला. त्यास आ. लक्ष्मण पवार यांनी अनुमोदन दिले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
तिकिटाचे स्वप्न, पण निवडून कसे येणार?
सत्तेच्या काळामध्ये माझ्या मागेपुढे फिरून करोडो रुपयांची कामे मिळवली तेच लोक माझ्याबद्दल व पक्षाबद्दल नाराजीचा सूर काढतात. काही लोकांनी आपली निष्ठा खुंटीला बांधली. नेता भेटेल तसे फोटो बदलतात. पक्ष हे माझे घर आहे. याकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहू नये. काही लोक दिल्लीतून तिकीट मिळविण्याचे स्वप्न पाहतात. परंतु, निवडून येण्याचे स्वप्न कसे पूर्ण करणार, असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला.