माजलगावात राजकीय उलटफेर; कारखाना वाचवण्यासाठी जगताप देणार नगरपालिका सोळंके गटाच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 06:00 PM2020-10-27T18:00:18+5:302020-10-27T18:11:48+5:30

चार वर्षांपूर्वी आ.प्रकाश सोळंके गटाच्या विरोधात मोहन जगताप गटाने आघाडी तयार करत तत्कालीन आ.आर.टी. देशमुख (भाजपचा) यांचा पाठिंबा मिळवला होता.

A major upheaval in Majalgaon; Jagtap will support MLA Solanke group in the Majalgaon Mayor election for saving the sugar factory | माजलगावात राजकीय उलटफेर; कारखाना वाचवण्यासाठी जगताप देणार नगरपालिका सोळंके गटाच्या ताब्यात 

माजलगावात राजकीय उलटफेर; कारखाना वाचवण्यासाठी जगताप देणार नगरपालिका सोळंके गटाच्या ताब्यात 

googlenewsNext
ठळक मुद्दे बहुमत नसताना होणार आमदार सोळंके गटाचा नगराध्यक्ष जगताप - सोळंके यांच्यातील अलिखित कराराची तालुक्यात चर्चा 

- पुरुषोत्तम करवा

माजलगाव : स्वतःचा साखर कारखाना वाचवण्यासाठी मोहन जगताप यांच्या ताब्यात असलेली नगरपालिका आ.प्रकाश सोळंके यांच्या ताब्यात देण्याची पूर्ण तयारी झाली असुन बहुमत नसतांना नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सोळंके गट सज्ज झाला आहे. 

चार वर्षापूर्वी माजलगाव नगरपालिकेची निवडणूक झाली होती. नगराध्यक्षपद सर्वसाधारणसाठी व नगराध्यक्षाची निवड जनतेतुन होणार असल्याने या निवडणुकीला खुपच महत्त्व आले होते. आ.प्रकाश सोळंके गटाच्या विरोधात मोहन जगताप गटाने आघाडी तयार करत तत्कालीन आ.आर.टी. देशमुख (भाजपचा) पाठिंबा मिळवला होता. त्यांना बाबुराव पोटभरे यांनी देखील पाठिंबा दिला व सहाल चाऊस यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत सहाल चाऊस यांचा विजय झाला व त्यांनी पुर्ण बहुमत देखील मिळावले होते.त्यानंतर सहाल चाऊस यांनी आ.आर.टी. देशमुख, आघाडीचे नेते मोहन जगताप व बाबुराव पोटभरे यांना विचारात घेतले नाही व मनाला वाटेल ते निर्णय घेतले. त्यानंतर अडचणीत सापडलेल्या चाऊस यांच्यापासुन हे सर्व नेते दुरावले.

आ.प्रकाश सोळंके गटाच्या नगरसेवकांनी अविश्वास दाखवला तेव्हा आघाडीचे व भाजपच्या नगरसेवकांनी चाऊस यांच्याविरोधात झेंडा उचलला. तेव्हा या नेत्यांनी आपआपल्या नगरसेवकांना न सावरता चाऊस यांच्या विरुद्ध जाण्यास सांगितले. सहाल चाऊस यांचे नगराध्यक्षपद गेल्यानंतर व नियमात बदल झाल्यानंतर नगरसेवकातुन नगराध्यक्ष ९ नोव्हेंबर रोजी निवडण्यात येणार आहे. यात मोठ्या घडामोडी होतील अशी अपेक्षा होती मात्र असे काही होईल असे सध्यातरी वाटत नाही.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने उलटफेर

मोहन जगताप यांच्या ताब्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणुक तोंडावर असून, आपल्याला आ.सोळंके गटाचा विरोध केला तर आपल्याला कारखान्याला अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणुन जगताप यांनी आ.सोळंके यांच्या सोबत पुढील चार वर्षासाठी छुपी युती केली असल्याचे जगतापांच्याच कार्यकर्त्यांकडुनच बोलले जात आहे. त्याचा प्रत्ययही १५ दिवसापुर्वीच आला आहे. बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीच्या निवडणुकीत जगताप गटाला उपसभापतीपद दिले होते. यानंतरच्या काळातील जगतापाच्या कारखान्याला आ.सोळंकेनी सहकार्य करायचे व जगतापाला दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समितीच्या जागेवर आ. प्रकाश सोळंकेनी सहकार्य करायचे व बाकीच्या राजकीय गणितात जगतापांनी सोळंकेना सहकार्य करायचा अलिखीत कराराची चर्चा सध्या तालुक्यात दिसून येत  आहे. 

संपूर्ण तालुक्याचे लक्ष
येत्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जगतापांनी बहुमत असतांना व पंकजा मुंडे यांनी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी जगतापांशी चर्चा केल्याचे सांगितले जाते परंतु जगतापांनी आ.सोळंके गटाला सहकार्य केल्यास त्यांच्या छुप्या युतीवर शिक्कामोर्तब होऊ शकते. यासाठी ९ तारखेलाच काय होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: A major upheaval in Majalgaon; Jagtap will support MLA Solanke group in the Majalgaon Mayor election for saving the sugar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.