माजलगाव तालुक्यात आरोग्य विभागच आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:21 IST2021-02-05T08:21:37+5:302021-02-05T08:21:37+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : प्राथमिक केंद्र व उपकेंद्रात मागील अनेक वर्षांपासून डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने तालुक्यातील आरोग्य ...

माजलगाव तालुक्यात आरोग्य विभागच आजारी
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : प्राथमिक केंद्र व उपकेंद्रात मागील अनेक वर्षांपासून डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने तालुक्यातील आरोग्य खातेच आजारी पडले आहे. २७ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये पदे रिक्त असल्याने सध्या उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण वाढला असताना वरिष्ठांचे याकडे मात्र लक्ष नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
माजलगाव तालुक्यात १०५ गावे असून या गावातील लोकसंख्या दीड लाखांच्या आसपास आहे. तालुक्यातील या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात मागील अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची संख्या शहराच्या मानाने मोठ्या प्रमाणावर होती. ग्रामीण भागात पसरणाऱ्या आजारामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो हे नाकारता येणार नाही. कोरोना आपत्तीकाळात गरज असताना ७९ पदे अद्यापही रिक्त आहेत. यामुळे माजलगाव तालुक्याची आरोग्य यंत्रणाच आजारी पडल्याचे चित्र आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कारभार सोपविल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर ताण वाढला असून रूग्णांना सुविधा मिळणे अवघड झाले आहे. यामुळे रूग्णांना खाजगी दवाखान्यांचा आधार घेण्याची वेळ आली असून आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. रिक्त पदांमुळे वेळेवर रुग्णाना उपचार मिळणे कठीण झाले आहे.
जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा
तालुक्यातील आरोग्य विभागाने अनेक पदे रिक्त आहेत, ही पदे लवकरात लवकर भरण्यात यावी म्हणून अनेक वेळा जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येत आहेत .लवकरच रिक्त पदे भरण्यात येतील यानंतर सर्व सुरळीत होईल.
---डॉ. मधुकर घुबडे , तालुका आरोग्य अधिकारी,माजलगाव.
------
रिक्त पदे व संख्या
वैद्यकीय अधिकारी -२ ,
औषधी निर्माण अधिकारी- २,
प्रयोगशाळा तंत्रज्ञ -४
आरोग्य सहाय्यक पुरूष - ५,
आरोग्य सहाय्यक महिला- ४,
परिचारिका - १२
कनिष्ठ सहाय्यक - २
एम. पी. डब्ल्यू -१८
वाहन चालक -५
परिचर -१४
अर्धवेळ सेविका-१३
-------
माजलगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र -पाच
गंगामसला , पात्रुड , टाकरवण , सादोळा ,किट्टी आडगाव
तालुक्यातील उपकेंद्रांची संख्या - २२