माजलगावला शेतकरी- कारखानदारांच्या बैठकीत विष घेण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:48 IST2017-11-29T00:48:03+5:302017-11-29T00:48:23+5:30
उसाच्या प्रश्नावर होत असलेल्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाने हस्तक्षेप करत शेतकरी आणि कारखाना प्रतिनिधींची येथील तहसील कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत कारखाने भाव जाहिर करीत नसल्याने शेतकरी नेते गंगाभिषण थावरे यांनी विषारी द्रव प्राशन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

माजलगावला शेतकरी- कारखानदारांच्या बैठकीत विष घेण्याचा प्रयत्न
माजलगाव : उसाच्या प्रश्नावर होत असलेल्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासनाने हस्तक्षेप करत शेतकरी आणि कारखाना प्रतिनिधींची येथील तहसील कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत कारखाने भाव जाहिर करीत नसल्याने शेतकरी नेते गंगाभिषण थावरे यांनी विषारी द्रव प्राशन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
जयमहेश, छत्रपती आणि लोकनेते सुंदरराव सोळंके या कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु होऊन एक महिना उलटला तरी भाव जाहीर केलेला नाही. या विरोधात विविध शेतकरी संघटना तसेच शिवसेना आंदोलन करीत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
दरम्यान ऊस दरासंदर्भात तोडगा निघावा या हेतुने प्रशासनाने मंगळवारी येथील तहसील कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार एन.जी. जंपलवाड, साखर सहसंचालक औरंगाबाद यांचे प्रतिनिधी शेख रशीद, सहायक निबंधक एस.बी. घुले आदींसह कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून एम.डी. घोरपडे, आर.एस. शिंदे, गिरीश लोखंडे आदी उपस्थित होते.
तब्बल तीन तास चर्चा झाली. कारखान्यांचे प्रतिनिधी हे आडमुठे धोरण अवलंबित एफ.आर.पी. पेक्षा शंभर ते दीडशे रुपये जास्त भाव देऊ, म्हणून वेळ मारुन नेत होते. तर किमान मागीलवर्षी दिलेला २६०० रुपये भाव कारखान्यांनी जाहीर करावा या मागणीवर शेतकरी ठाम होते. कारखाने भाव जाहीर करीत नसल्याने गंगाभिषण थावरे यांनी आक्रमक होत तेथेच विष घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी व कारखाना प्रतिनिधींची भंबेरी उडाली. अखेर शेतकºयांंनीच त्यांच्याकडील बाटली हिसकावून घेत रोखले.
आमदार देशमुखांच्या नावाने शेतक-यांची बोंब
तालुक्यात आंदोलन व बैठक होत असताना येथील आ. आर.टी. देशमुख हे चकार शब्दही बोलत नाहीत. तसेच बैठकीला ते किंवा त्यांचे प्रतिनिधी कोणीच उपस्थित नाहीत म्हणून उपस्थित शेतकºयांनी निषेध करीत त्यांच्या नावाने भर बैठकीत बोंब मारली.