सराफा खून प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST2021-06-02T04:25:24+5:302021-06-02T04:25:24+5:30
बीड : शिरूर कासार येथील एका सराफा व्यापाऱ्याचा दागिने खरेदीच्या बहाण्याने निर्घृणपणे खून केल्याची घटना २३ मे रोजी उघडकीस ...

सराफा खून प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत
बीड : शिरूर कासार येथील एका सराफा व्यापाऱ्याचा दागिने खरेदीच्या बहाण्याने निर्घृणपणे खून केल्याची घटना २३ मे रोजी उघडकीस आली होती. बीड जिल्ह्यात खून करून अहमदनगर जिल्ह्यात मृतदेह पुरण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना यापूर्वीच अटक केली असून, स्थानिक गुन्हे शाखेने नाशिक येथून मुख्य आरोपीच्या मुसक्या १ जून रोजी पहाटेच्या सुमारास आवळल्या. सकाळी पुढील तपासासाठी शिरूर पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले आहे.
विशाल सुभाष कुलथे (वय २४ रा. बालाजीनगर शिरूर कासार ) असे खून झालेल्या सराफा व्यापाऱ्याचे नाव आहे. या घटनेतील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भैया शिवाजी गायकवाड (रा. भातकुडगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ज्ञानेश्वर याने इतर संशयितांच्या मदतीने विशाल यांचा खून करुन त्यांच्याकडील ११ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ४ किलो चांदी असे ८ लाख ३७ हजार ८०० रुपयांचे दागिन्यांची लूट केल्याचे उघडकीस आले. तसेच विशाल यांचा मृतदेह शेवगाव तालुक्यात पुरला.
मयत विशाल कुलथे हे २० मे रोजी सायंकाळपासून बेपत्ता होते. ते सापडत नसल्याने शिरूर पोलीस ठाण्यात २१ मे रोजी बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान विशाल सोबत सोने खरेदीच्या बहाण्याने खुनातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भैया गायकवाड याने ओळख केली होती. तो बेपत्ता झाला त्यादिवशी शिरूर मधून मुख्य आरोपीच्या दुचाकीवरून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २१ रोजी त्याला ठाण्यात बोलावून चौकशी देखील केली मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या गावी जाऊन विचारपूस केली. तर, तो खून केल्याच्या रात्री गावात आला व एकाकडे फावडे मागितल्याची माहिती मिळाली. तोपर्यंत मुख्य आरोपी फरार झाला होता. त्याचा साथीदार केतन संतोष लोमटे व अनिल मांडकर (रा. आनंदनगर पाथर्डी ता. अ.नगर) आणि मुख्य आरोपीचे वडील शिवाजी गायकवाड यांना २३ मे रोजी अटक करण्यात आली होती.
स्थानिक गुन्हे शाखेने नाशिक येथील नाशिक रोड परिसरातून १ जून रोजी पहाटे त्याच्या मुसक्या आवळता आल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पोनि भारत राऊत, पोहे. बालाजी दराडे, सलीम शेख, काळे, विकास वाघमारे, गणेश हांगे, महिला पोलीस संगीता शिरसाट, चालक संजय जायभाय यांनी केला. ज्ञानेश्वर गायकवाड याला ७ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महिलेचा निर्घृणपणे खून
फेसबुकवरून नाशिक येथील एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत ज्ञानेश्वर गायकवाड हा राहत होता. दरम्यान तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा देखील निर्घृणपणे खून केला होता. महिलेच्या चेहऱ्यावर दगडाने मारल्यामुळे ओळख पटली नव्हती. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होते. या तपासादरम्यान त्याने ही कबुली दिली. यात केतन सुभाष लोमटे याचा देखील समावेश होता.
===Photopath===
010621\01_2_bed_19_01062021_14.jpeg
===Caption===
आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड