तिच्यावर खूप प्रेम; पण ती ऐनवेळी बदलली, मला धोका दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:34 IST2021-01-03T04:34:01+5:302021-01-03T04:34:01+5:30
बीड : माझे तिच्यावर खूप प्रेम होते. आम्हा दोघांना तिच्या घरच्यांनी पकडले. यावेळी तिने मी याला बोलावलेच नाही, असे ...

तिच्यावर खूप प्रेम; पण ती ऐनवेळी बदलली, मला धोका दिला
बीड : माझे तिच्यावर खूप प्रेम होते. आम्हा दोघांना तिच्या घरच्यांनी पकडले. यावेळी तिने मी याला बोलावलेच नाही, असे सांगून बदलली. मला खूप मोठा धोका दिला. म्हणून मनात राग होता. गावी येताच हा राग मला अनावर झाला आणि हल्ला केला. ही कहाणी प्रेयसीवर हल्ला करणारा आशिक पोलिसांना सांगत आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याने मनातील सर्व काही बोलून दाखविले.
बीड तालुक्यातील रामनगर येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर गावातीलच पोपट बोबडे (२७, रा. महालक्ष्मी चौक, रामनगर, ता. बीड) याने तलवारीने हल्ला केल्याची घटना ३० डिसेंबर रोजी घडली होती. यात या मुलीवर बीडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या प्रकरणात पोपटविरोधात बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. त्याला पकडण्यासाठी पथके रवाना केली होती. शुक्रवारी सायंकाळी बहिरवाडी शिवारातील उसाच्या शेतात लपलेला असताना त्याला बीड ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यानंतर चौकशी केली असता पोपट खडाखडा बोलू लागला. आपले तिच्यावर खूप प्रेम होते; परंतु ती नातेवाइकांसमोर बदलली. मला धोका दिल्याने मनाला खूप त्रास झाला. मला बोलतही नव्हती. त्यामुळे माझ्या मनात खूप राग होता. हाच राग मला अनावर झाला. तिला समजावून सांगितले तरी तिने ऐकले नाही. मग याच रागातून मी काय केले हेच मला समजले नाही, असे पोपट पोलिसांना सांगत असल्याचे सूत्रांकडून समजले. आता या प्रकरणात आणखी पोलिसांच्या हाती काय लागते, हे वेळच ठरविणार आहे.
५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
पोपटला बहिरवाडी शिवारात शुक्रवारी रात्री बेड्या ठोकल्यानंतर शनिवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यात त्याला ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास अधिकारी सपोनि. योगेश उबाळे यांनी ही माहिती दिली.