लॉकडाऊन, अनलॉकमध्ये खवा विक्रीने शेतकऱ्यांना तारले - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:35 IST2021-08-23T04:35:20+5:302021-08-23T04:35:20+5:30
परळी : कधी कोरडा दुष्काळ, तर कधी ओला दुष्काळ अशा स्थितीत नेहमी शेतकरी सापडत असताना तालुक्यातील नंदागौळ, अंबलवाडी व ...

लॉकडाऊन, अनलॉकमध्ये खवा विक्रीने शेतकऱ्यांना तारले - A
परळी : कधी कोरडा दुष्काळ, तर कधी ओला दुष्काळ अशा स्थितीत नेहमी शेतकरी सापडत असताना तालुक्यातील नंदागौळ, अंबलवाडी व अंबाजोगाई तालुक्यातील तेलघणा, लेंडेवाडी येथील शेतकऱ्यांनी मात्र शेतीला जोडधंदा म्हणून खवा उत्पादनाला प्राधान्य दिले आहे. लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये खवा विक्रीने अनेकांना तारले आहे. परळीच्या बाजारपेठेत नंदागौळ, अंबलवाडीच्या खव्याला वाढती मागणी आहे. लॉकडाऊन असतानाही खव्याची शहरात चांगली विक्री करून खवा उत्पादकांनी घरखर्च भागवून मुलांचे शिक्षण व संगोपन केले आहे. लॉकडाऊनमध्ये मात्र खव्याची विक्री गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत घटली होती. आता अनलॉकनंतर पुन्हा खव्याची विक्री वाढू लागली. परळी तालुक्यातील नंदागौळ येथे घरोघरी दूध व खव्याचे उत्पादन केले जाते. येथील शेतकऱ्यांनी जोडव्यवसाय म्हणून दूध, खवा विक्रीचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून स्वीकारला आहे. दुसऱ्या पिढीतही खवा उत्पादन करणे व त्याची विक्री करणे हे चालू आहे. नंदागौळ येथील ८० टक्के शेतकरी खवा निर्मिती करून थेट बाजारात विक्री करतात. नंदागौळ येथून तयार खवा आणून शहरात त्याची विक्री करण्यात येते. अनलॉकनंतर खवा विक्रीत वाढ झाली. शहरातील वैजनाथ मंदिराजवळील रस्त्यावर खवा विक्री केली जाते. त्याशिवाय शहरातील स्वीट होम, हॉटेलमध्ये खव्याचा पुरवठा केला जातो. तसेच अंबलवाडी, तेलघणा येथील शेतकरीही खवा विक्रीवर भर देतात.
सध्या पशुखाद्य महागले आहे; परंतु खव्याचे भाव मात्र २०० रुपये आधी होते तितकेच आहेत. नंदागौळ येथे बचतगटाच्या माध्यमातून मिळालेल्या मशीनमधून खवा तयार करून विक्री केली जाते. चुलीवर व भट्टीवर खव्याचे उत्पादन शेतकरी करतात. शेती करून खवा बनविणे, विक्रीस प्राधान्य दिले. त्यामुळे घरखर्च भागवून मुलांचे शिक्षण करता आले.
- शिवाहार गीते, नंदागौळ, शेतकरी व खवा विक्रेते.
नंदागौळ व तेलघणा येथील खव्यास जिल्ह्यात वाढती मागणी आहे. तो चवीला छान आहे. गुलाबजामून बनविण्यासाठी याचा वापर केला जातो. सणासुदीत येथील खव्यास वाढती मागणी असते. - ज्ञानोबा रामभाऊ गित्ते, खवा उत्पादक.