लॉकडाऊनमुळे लालपरीचे अपघात घटले; २०१९ मध्ये ७६ तर २०२० मध्ये ३१ अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST2021-02-05T08:27:27+5:302021-02-05T08:27:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : लालपरीचा प्रवास सुखाचा, सुरक्षित आणि आरामदायी समजला जातो. त्यामुळे खासगी वाहनांपेक्षा बसने प्रवास करण्यास ...

लॉकडाऊनमुळे लालपरीचे अपघात घटले; २०१९ मध्ये ७६ तर २०२० मध्ये ३१ अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लालपरीचा प्रवास सुखाचा, सुरक्षित आणि आरामदायी समजला जातो. त्यामुळे खासगी वाहनांपेक्षा बसने प्रवास करण्यास प्राधान्य दिले जाते. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली. परंतु, याच लॉकडाऊनमुळे लालपरीचे अपघातही घटले आहेत. २०१९ मध्ये ७६ अपघात झाले होते तर २०२० मध्ये केवळ ३१ अपघात झाले.
जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाचे आठ आगार आहेत. यामध्ये ९७० चालक कर्तव्य पार पाडतात. बीड आगारातील सखाराम बोराडे आणि परळी आगारातील सोनाप्पा पवार या दोघांची ३० वर्षे सेवा पूर्ण झाली. या कार्यकाळात त्यांच्याकडून एकही अपघात झाला नाही, ही रापमसाठी अभिमानाची बाब आहे. एवढी विनाअपघात सेवा असतानाही वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांचा एकदाही सन्मान करण्यात आला नाही. २०१४ च्या आगोदर परिवहनमंत्री, आयुक्त यांच्या हस्ते अशा चालकांचा सत्कार होत होता. तसेच ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा देणाऱ्या चालकांची संख्या ४७ असून या सर्वांचा जिल्हास्तरावर सन्मान केला जातो.
८० ला स्पीड लॉक
बसेसना ८० चे स्पीड लॉक आहे. तरीही अपघात होत असल्याचे दिसते. याबाबत बीडचे आगारप्रमुख निलेश पवार यांना संपर्क साधून माहिती घेण्यात आली. यावर त्यांनी अनेकदा मोठ्या वाहनांची चूक धरली जाते. वास्तविक पाहता दुचाकी, पादचारी यांचीच चूक असते. स्पीड लॉक असल्याने अपघात होत नाहीत. चालकांना अपघात रोखण्यासाठी वारंवार मार्गदर्शन केले जाते. काही चालकांचे काम कौतुकास्पद आहे.
नियोजनात सुधारणा हवी
बसची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी विभागीय वाहतूक अधिकारी हे स्वतंत्र पद आहे. येथे संदीप पडवळ हे अधिकारी नियुक्त केले. परंतु, त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे आजही अनेक गावांमध्ये बस जात नाही. बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे राहुल वाईकर यांनी केली आहे.
विनाअपघात सेवा देणाऱ्यांना जिल्हास्तरावर बॅच बिल्ला देऊन सत्कार केला जातो. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, कामगार दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेतला जातो. चालकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो.
- बी.एस.जगनोर,
विभागीय नियंत्रक, रापम बीड
माझी सेवा ३२ वर्षांचीच आहे. एकही अपघात झालेला नाही. जिल्हास्तरावर सन्मान केला. बस चालविताना मन स्थिर असावे. कर्तव्यावर असताना इतर कसलाही डोक्यात विचार असू नये. नकारात्मक विचार व ताणतणावही अपघातास कारणीभूत ठरू शकतात.
- सखाराम बोराडे,
चालक, बीड आगार
मागील वर्षात झालेले एसटीचे अपघात
जानेवारी७
फेब्रुवारी३
मार्च५
एप्रिल०
मे ०
जून ०
जुलै१
ऑगस्ट०
सप्टेंबर२
ऑक्टोबर६
नोव्हेंबर३
डिसेंबर४