नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन अपरिहार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST2021-03-08T04:31:30+5:302021-03-08T04:31:30+5:30
प्रभात बुडूख बीड : कोरोना संसर्ग काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी कोरोनासंदर्भात नियम पाळण्याचे संदेश दिले ...

नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन अपरिहार्य
प्रभात बुडूख
बीड : कोरोना संसर्ग काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी कोरोनासंदर्भात नियम पाळण्याचे संदेश दिले जातात. मात्र, अनेकजण नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संसर्ग वाढतोय. प्रमाणापेक्षा जास्त रुग्ण आढळले तर ही संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करावा लागेल. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे. ‘लोकमत’ने घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या विकासासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या संदर्भात आपले मत व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप म्हणाले, यापूर्वी देखील बीड जिल्ह्यात काम केले आहे. त्यामुळे या ठिकाणचे प्रश्न व प्रशासनाकडून काय करणे गरजेचे आहे, याची जाणीव असल्यामुळे आणि जिल्हाधिकारी या प्रमुख पदावर असल्यामुळे तो प्रयत्न सतत असेल. यासाठी लोकप्रतिनिधींकडूनदेखील सहकार्य मिळणेदेखील महत्त्वाचे आहे. त्याचसोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गंत संवाद असणे गरजेचे आहे. त्याचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विषय नवीन असल्यामुळे माहिती नसते आणि फायली जागेवर ठप्प राहतात. त्यामुळे त्यांना संबंधित कामांचे प्रशिक्षण पुढील काळात दिले जाईल. प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी सुसंवाद असेल, तर अनेक प्रश्न सुटतात, असे ते म्हणाले.
लवादातील प्रकरणांसाठी सुटीचा दिवस
भूसंपादनाची अनेक प्रकरणं मागील काही काळापासून लवादाकडे प्रलंबित होते. ही प्रकरणं निकाली काढण्यासाठी शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवसांचा उपयोग केला जाणार आहे. त्याचे कामदेखील सुरू केले असून, काही प्रकरणांचा निपटारादेखील करण्यात आला असून, भूसंपादनाची प्रकरणं किचकट असले तरी कायद्याप्रमाणे निकाली काढण्यात येणार आहेत.
शेतकरी आत्महत्या रोखता येऊ शकतात
शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात सखोल माहिती घेतली, त्यावेळी कळले की कर्ज हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे बँकेतील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधणे गरजेचे आहे. ते भेटायला आले तर त्यांना वेळ देऊन समस्येचे निरसन करावे. शेतकऱ्यांनीदेखील खचून न जाता प्रशासनातील अधिकाऱ्यांची भेट घ्यावी. कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती गावागावांत जाऊन द्यावी व त्याचा लाभ कसा देता येईल याविषयी धोरण राबवावे, तर आत्महत्या रोखण्यास नक्कीच यश येईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.
===Photopath===
070321\072_bed_18_07032021_14.jpg
===Caption===
जिल्हाधिकारी रविंद्र जगताप