बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:31 IST2021-03-24T04:31:13+5:302021-03-24T04:31:13+5:30

बीड : कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात असून, २५ किंवा २६ मार्चच्या रात्रीपासून लॉकडाऊन ...

Lockdown again in Beed district | बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

बीड : कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात असून, २५ किंवा २६ मार्चच्या रात्रीपासून लॉकडाऊन लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी बुधवारी निर्णय जाहीर करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रोज जवळपास २०० रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळ‌े वाढत असलेला संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतला जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढू नये यासाठी जिल्हा व आरोग्य प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन वेळोवेळी केले जात होते. मात्र, नागरिकांमधून काळजी घेतली जात नसल्याचे चित्र होते. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचा निष्कर्ष प्रशासनाकडून काढण्यात आला आहे. तर, व्यापाऱ्यांना देखील कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले होते. मात्र, त्यांच्याकडून देखील अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. कोरोना चाचणी न केलेल्या व्यापाऱ्यांचे दुकाने सील केल्यानंतर मंगळवारी व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र होते.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागाच्या प्रमुखांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी १० दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती असून, हा निर्णय बुधवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी जाहीर करणार आहेत. नागरिकांनी काळजी घेतली तर, हा कालावधी कमी होणार असून वाढत असलेल्या संसर्गाची साखळी तोडण्याचा उद्देश प्रशासनाचा आहे. या कालावधीमध्ये अत्यावश्यक बाबींना सुट दिली जाणार आहे. तर, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व पर्याय नसल्यामुळे हा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागत असल्याचे मत प्रशासनाकडून व्यक्त केले जात आहे.

नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, सर्वसामान्य नागरिकांना याची लागण झाली तर, त्यांना आर्थिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने हानी होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असून, लॉकडाऊनमुळे संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे.

वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला इशारा

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढत असताना, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी वेळोवेळी हात धुवा, स्वच्छता पाळा, सॅनिटायझर वापरा व सोशल डिस्टन्सचे पालन करून संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या असे ‌आवाहन केले होते. तसेच रुग्ण संख्या वाढल्यास लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे देखील सांगितले होते. त्यानंतर देखील रुग्णसंख्या वाढल्यामुळे पर्याय नसल्यामुळे व नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊनचा निर्णय जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागत असल्याचे समजते.

Web Title: Lockdown again in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.