आॅनलाईन शॉपिंगमुळे बीडमध्ये स्थानिक बाजारपेठेत उलाढाल मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:05 IST2018-03-15T00:01:40+5:302018-03-15T00:05:07+5:30
बीड शहरात मागील दोन वर्षात आॅनलाईन खरेदीच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेवर त्याचा परिणाम जाणवत असून उलाढालीवरही कमालीचा परिणाम झाला आहे.

आॅनलाईन शॉपिंगमुळे बीडमध्ये स्थानिक बाजारपेठेत उलाढाल मंदावली
बीड : शहरात मागील दोन वर्षात आॅनलाईन खरेदीच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेवर त्याचा परिणाम जाणवत असून उलाढालीवरही कमालीचा परिणाम झाला आहे.
घरपोच वस्तू मिळत असल्याने अशी खरेदी करण्याचे आकर्षण वाढले आहे. काही वस्तू स्थानिक बाजारपेठेत मिळतच नाहीत. काही मिळतात तर त्याचे दर जास्त वाटतात. त्यामुळे स्थानिक बाजारातील दुकानात तत्काळ लागणाऱ्या गरजेच्या वस्तुंच्या खरेदीपुरतीच ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. त्यामुळे बाजारातील व्यवहार मंदावले आहेत.
मोबाईल, साडी, कपडे, बुट, सौंदर्य प्रसाधने, संगणक, कॅम-याचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक वस्तू त्याचबरोबर फर्निचर, गृहोपयोगी साहित्य खरेदीवर ग्राहकांचा भर असल्याचे पहायला मिळते. काही कंपन्या जाहिरातीद्वारे तसेच गिफ्ट व्हाऊचर, पुढील खरेदीत सवलतीचे कूपन अशी आमिषे दाखवतात. त्यामुळे सामान्य वस्तूही आॅनलाईन मागविल्या जात असल्याचे दिसून आले. शहरात ब्रॅन्डेड कंपन्यांच्या कपड्यांचे शोरुम तसेच वितरक असलेतरी आॅनलाईन खरेदीवर अनेकजण भर देत आहेत. त्यामुळे स्थानिक कापड बाजारपेठेवर परिणाम दिसून येत आहे.
ग्राहकीची परिभाषा बदलत असल्याने ग्राहक पंचायतला प्रबोधनासाठी नवे प्रयोग करावे लागणार आहे. खाजगी रुग्णालये, बांधकाम, बियाणे, बँका आदी क्षेत्रातील ग्राहकांच्या तक्रारी हाताळण्यात आल्याचे ग्राहक पंचायतच्या वतीने सांगण्यात आले.
मोबाईलचा ‘नवा’ व्यापार
काही ब्रॅन्डेड कंपन्यांचे मोबाईल केवळ आॅनलाईन शॉपिंगवरच मिळत असल्याने काही विक्रेते तसेच तरुण सवलतीच्या काळात विविध नावांवर नोंदणी करुन मोबाईल मागवून स्टॉक करुन ठेवतात. गरजू ग्राहक आल्यास त्याच्याकडून २०० ते ५०० रुपये जास्त घेऊन विकतात. दुसºयाच्या नावावर मागवून तिसºयाला विकण्याचा नवा व्यापार सध्या फोफावला आहे. यामुळे शासनाचा कर बुडत असल्याचे काही मोबाईल वितरकांनी सांगितले.
मोबाईल बाजाराला फटका
आॅनलाईन शॉपींगद्वारे खरेदी करणाºयांमध्ये मोबाईल ग्राहकांची संख्या जास्त आहे. वैशिष्टयपूर्ण फीचर, नवे मॉडेल तसेच आकर्षक सवलतींमुळे किंमतीची तुलना व खात्री करण्यासाठी ग्राहक स्थानिक बाजारात फक्त चौकशी करतात. किंमत जास्त वाटल्यास विक्रेत्यांना आॅनलाईनवरील किंमतीचा संदर्भ देतात. आॅनलाईन शॉपींगमुळे बीडच्या मोबाईल बाजारपेठेवर ७० टक्के परिणाम झाल्याचे विक्रेते शैलेश भुतडा म्हणाले.
जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष आर. टी. गर्जे म्हणाले, आॅनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी सजग राहणे महत्त्वाचे आहे. खात्रीशीर कंपन्यांकडूनच खरेदी करावी. आॅनलाईन शॉपिंगबाबत येणाºया जाहिराती, सवलतींची आणि दर्जाची खात्री करताना फसवणूक होणार नाही यासाठी दक्ष रहावे.