परवानाधारक सावकारांचे २ कोटींपर्यंत कर्ज, खासगी सावकारांची मात्र भरमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:46 IST2021-01-08T05:46:54+5:302021-01-08T05:46:54+5:30
बीड : जिल्ह्यात नोंदणीकृत सावकारांकडून केवळ दहा शेतकऱ्यांनी कर्ज घेतले असून तारणी व बिगरतारण कर्जाचा आकडा दोन कोटींच्या ...

परवानाधारक सावकारांचे २ कोटींपर्यंत कर्ज, खासगी सावकारांची मात्र भरमार
बीड : जिल्ह्यात नोंदणीकृत सावकारांकडून केवळ दहा शेतकऱ्यांनी कर्ज घेतले असून तारणी व बिगरतारण कर्जाचा आकडा दोन कोटींच्या घरात आहे. खरीप वा रबी हंगामाच्या पेरणीआधी बँकेकडून वेळेवर कर्ज मिळण्यास होणारा विलंब तसेच विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना सावकारांचा आधार घ्यावा लागतो. त्याचबरोबर शेतकरी नसलेल्या इतर गरजू व्यावसायिक, नागरिकही गरजेच्या वेळी सावकारांकडून कर्ज घेतात. लोकमतकडे प्राप्त आकड्यांनुसार नोंदणीकृत सावकारांकडून केवळ बीड तालुक्यात १० शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे.
जिल्ह्यात ११६ परवानाधारक सावकार असल्याची नोंद आहे. त्यांच्याकडून एकूण ९६५ जणांनी कर्ज घेतल्याचे सांगण्यात येते. यापैकी ७ प्रकरणे तारण प्रकारातील असून ४ लाख ७० रुपयांचे हे कर्ज आहे. तर विनातारणी कर्ज ९५८ जणांनी घेतले असून हा आकडा १ लाख ८४ हजार रुपयांपर्यंत आहे. सरकारी कागदावरील हे आकडे असलेतरी खाजगी स्वरूपात अनधिकृत सावकारांकडून कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे.
------
अनधिकृत सावकारी
दिवसाला दहा टक्के, आठवड्याला, महिन्याला १० ते १५ टक्के दराने व्याज वसुली केली जाते. शेतजमीन गहाण ठेवून किंवा येणारे पीक बाजारभावाने घेऊन व्याजासह कर्जाची वसुली केली जाते. काही सावकारांनी निधी बँक, पतसंस्था, मल्टीस्टेट व इतर संस्थांच्या माध्यमातून आपले व्यवसाय भरभराटीला आणले आहेत. विनापरवाना सावकारीचे तीन गुन्हे नोंद आहेत. तर खाजगी सावकारांकडून छळ केला जात असल्याच्या तक्रारी सहकार व पोलीस विभागाकडे प्राप्त होतात. पोलिसांत दाखल गुन्ह्यांची नोंद वेगळी आहे.
---------
वर्षात १६७ आत्महत्या
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत जवळपास १६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी ६० अपात्र ८८ जणांना शासकीय मदत मिळाली. २९ प्रस्ताव चौकशीवर आहेत. शेतकरी आत्महत्येच्या विविध कारणांमध्ये खासगी सावकारीचा तगादा हे प्रामुख्याने सांगितले जाते. मात्र, अशा व्यवहारांची नोंद अथा पुरावा नसल्याने खासगी सावकार सहिसलामत सुटतात. हतबल शेतकरी कुटुंब व प्रशासन काहीच करू शकत नाही.
जिल्ह्यात अधिकृत सावकार ११६
१६७ शेतकऱ्यांनी वर्षभरात मृत्यूला कवटाळले.
---------------
तालुका सावकार कर्ज रक्कम (बिगर शेतकरी)
बीड- ३३ ६०,००,०००
केज- ०९ १०,००,०००
धारूर- ०३ ०५,०००००
माजलगाव- ०७ १०,०००००
गेवराई- ०१ ०२,०००००
अंबाजोगाई- २९ २२, ०००००
परळी- ३३ ८०,०००००