प्रेमाने केले आयुष्य आंधळे; दोघांच्या वादात जळाल्याने ४ वर्षे १० महिन्यांपासून तरुणी खिळली अंथरुणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 11:50 AM2020-01-30T11:50:57+5:302020-01-30T12:05:42+5:30

दोघांच्या वादात जळाल्याने तरुणी ८० टक्के भाजली.

Life blinded by love; For 4 years and 10 months, the young girl was struggle for life | प्रेमाने केले आयुष्य आंधळे; दोघांच्या वादात जळाल्याने ४ वर्षे १० महिन्यांपासून तरुणी खिळली अंथरुणाला

प्रेमाने केले आयुष्य आंधळे; दोघांच्या वादात जळाल्याने ४ वर्षे १० महिन्यांपासून तरुणी खिळली अंथरुणाला

Next
ठळक मुद्देतारुण्याची नशा; जीवनाची दुर्दशा  पालक, नातेवाईकांनी ढुंकूनही पाहिले नाही

- सोमनाथ खताळ 
 

बीड : प्रेम आंधळं, प्रामाणिक आणि नि:स्वार्थीही असते. परंतु हे प्रत्येकाच्या नशिबात नसते. कुटुंबाचा विरोध झुगारून एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळवणे एका तरुणीला चांगलेच अंगलट आले. दोघांच्या वादात जळाल्याने ती ८० टक्के भाजली. चार वर्षे १० महिने ११ दिवस अंथरुणावर खिळून राहिल्यावर तिला आता हक्काची ‘सावली’ मिळणार आहे. 

सोनाली (नाव बदलले, वय २७) ही साधारण ११ वी च्या वर्गात असताना गावातील शेजारी राहणाऱ्या सुनीलसोबत तिची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. आयुष्यभराची साथ देण्यासाठी त्यांना जात आडवी आली. घरच्यांचा विरोध झाल्याने तिने गाव सोडून जालना गाठले. औरंगाबादला नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि जालना येथील खाजगी रुग्णालयात नोकरी सुरू केली. सुनील गावाकडून येणे जाणे करीत असे. विवाह झाला नसला तरी ते एकत्रच राहत होते, असे सांगण्यात आले. दरम्यान, १९ मार्च २०१५ या दिवशी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सुनील मद्यपान करून सोनालीच्या खोलीवर आला. दोघांमध्ये संशयावरून वाद झाले. सुनीलने मारहाण केली. सोनालीला राग अनावर झाला आणि तिने पेट्रोल टाकून दुचाकी पेटविली. आग भडकल्याने दुचाकीचे सायलन्सर फुटून स्फोट झाला. यात सोनाली  ८० टक्के भाजली.

सुनीलने नशेतच तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याने प्रेमाची शपथ घालून तक्रार देऊ नको, म्हणून अट घातली. सोनाली प्रेमाला प्रामाणिक राहिली. तिने त्याच्याविरोधात तक्रार दिली नाही; परंतु  सुनीलने तिचा हात सोडला. जळाल्यानंतर सहा महिने औरंगाबाद, त्यानंतर  पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयातील जळीत कक्ष, पुन्हा मुंबईच्या जे जे रुग्णालयात शस्त्रक्रियासाठी एक वर्ष आणि परत जिल्हा रुग्णालयात, असा तिचा हा प्रवास तब्बल ४ वर्षे १० महिने ११ दिवसांचा  (२९ जानेवारी २०२० पर्यंत) राहिला. आता तिला दोन दिवसांत कोल्हापूर येथील सावली केअर सेंटरला पाठविले जाणार आहे.  सुनीलचा मात्र, अद्यापही थांगपत्ता नसल्याचे समजते.

पालक, नातेवाईकांनी ढुंकूनही पाहिले नाही
सोनालीला आई-वडिलांसह एक बहीण आणि दोन भाऊ आहेत. ही दुसऱ्या क्रमांकाची. घर सोडल्यापासून तिला कोणीच बोलले किंवा भेटले नाही. जळाल्यानंतरही साधा एक फोनही कुटुंब किंवा नातेवाईकांनी केला नसल्याचे सोनाली सांगते. 

अनेकांची मदत
माजी मंत्री बदामराव पंडित यांनी  जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यापासून ते मुंबईतील शस्त्रक्रिया करण्यापर्यंतच खर्च आणि देखभाल पंडित यांनी केल्याचे सोनाली सांगते. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे, परिचारिका संगीता दिंडकर व त्यांच्या टीमने सोनालीची कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतली.

सोनालीला कोल्हापूर येथील सावली केअर सेंटरला पाठविण्याची सर्व तयारी झाली आहे. प्रशासनाकडून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन दिवसांत तिला पाठविले जाईल. नातेवाईक, कुटुंब कोणीही तिला भेटायला आले नसल्याने आम्ही पुढाकार घेतला. 
- तत्त्वशील कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, बीड

Web Title: Life blinded by love; For 4 years and 10 months, the young girl was struggle for life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.