बीड : जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांमार्फत देण्यात येणाऱ्या गौण खनिज तात्पुरता उत्खनन परवानगीनुसार दगड, माती, मुरुम वाहतुकीसाठी यापुढे वाहतूक परवाने वापरणे बंधनकारक करण्यात येत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
महसूल व वनविभागाच्या १२ नोव्हेंबर २०२०अन्वये गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी वाहतूक परवाना देण्याबाबत बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रारूप वापरले जात आहे. त्यामुळे वाहतूक परवान्याबाबत एकसंधता दिसून येत नाही. ज्यामुळे खोटे वाहतूक पास बनवून वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन तसेच वाहतुकीला प्रभावी आळा घालण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील वाहतूक परवान्यामध्ये एकसूत्रता येण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी वाहतूक परवान्याचे प्रारूप निश्चित करण्यात आलेले आहे.
बीड जिल्ह्यातील मंजूर करण्यात आलेल्या सर्व खाण पट्टाधारकांना (स्टोन क्रेशर) यापुढे दगड,खडी वाहतुकीसाठी परवान्यासह वाहतूक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापुढे गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनासोबत शासन पत्र १२ नोव्हेंबर २०२०नुसार गौण खनिज वाहतूक परवाना नसल्यास ही वाहतूक अवैध समजण्यात येऊन या वाहनावर प्रचलित शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच ज्या क्षेत्रामध्ये अवैध वाहतूक करणारे वाहन आढळून आल्यास त्या क्षेत्रातील संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाविषयी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.