आरोग्याचे वाण देऊ-घेऊ, एकात्मतेचा संदेश घेऊन जावू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST2021-02-05T08:27:04+5:302021-02-05T08:27:04+5:30
- फोटो बीड : ज्या महिलांना कोणत्याही शुभकार्यापासून दूर ठेवले जाते, अशा महिलांना एकत्रित आणून त्यांना समाजात स्थान देण्यासाठी ...

आरोग्याचे वाण देऊ-घेऊ, एकात्मतेचा संदेश घेऊन जावू
- फोटो
बीड : ज्या महिलांना कोणत्याही शुभकार्यापासून दूर ठेवले जाते, अशा महिलांना एकत्रित आणून त्यांना समाजात स्थान देण्यासाठी अनेक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने विधवा व सुवासिनींना एकत्र आणून हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमांसह भजन, संगीत खुर्ची असे खेळही घेण्यात आले. यावेळी आरोग्य तपासणी करून एकप्रकारे आदर्श वाण देण्यात आले.
बीड तालुक्यातील कळसंबर येथे नेकनूर रुग्णालय, आरसा फाऊंडेशन, एकल महिला संघटना, प्रगती ग्रामसंघ पिंपळवाडी, यशस्वी ग्रामसंघ मोरगाव, आपला परिवार अनाथ वृद्धाश्रम कळसंबर यांच्या संयुक्त विद्यमाने तिळगुळ व हळदी-कुंकूनिमित्त आरोग्य तपासणीसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात विधवा, सुवासिनी महिलांसह तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत जेवणाचा अस्वादही घेतला. यानिमित्ताने विधवा महिलांना आधार मिळाला आहे. आरोग्याचे वाण देऊ-घेऊ, एकात्मतेचा संदेश घेऊन जावू हे घोषवाक्य डोळ्यासमोर ठेवून हा आदर्श कार्यक्रम घेण्यात आला. महिलांनी एकमेकींना हळदी- कुंकू लावल्यानंतर तिळगुळ देऊन गोड बाेलण्यासह चांगले वागण्याचे वचन दिले. तसेच वाण म्हणून वस्तू वगैरे न देता आरोग्य तपासणी करण्यात आली. असा आगळावेगळा उपक्रम राबविल्याने आयोजकांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
कार्यक्रमाला मनीषा पवार,अर्चना सानप, सुजाता मोराळे, कोमल मस्के, मंगल मारगुडे, शिवाजी भड, मंगल कानडे, डॉ. मेधा शिंदे, संगीता भराट, प्रियंका कागदे आदींची उपस्थिती होती.