लग्नाळू तरुणांना लैला -मजनूने घातला लाखो रुपयांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:33 IST2021-03-17T04:33:59+5:302021-03-17T04:33:59+5:30
अविनाश कदम आष्टी : तरुणांची फसवणूक करवून विवाह करणाऱ्या व मागितलेली खंडणी न दिल्यास बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल ...

लग्नाळू तरुणांना लैला -मजनूने घातला लाखो रुपयांना गंडा
अविनाश कदम
आष्टी : तरुणांची फसवणूक करवून विवाह करणाऱ्या व मागितलेली खंडणी न दिल्यास बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. मुलीचा मामा म्हणून मिरविणाऱ्याला अटक केल्यानंतर पोलीस इतर आरोपींचा शोध आहेत. लातूर ते खर्डापर्यंत मामाचे व लैला मजनूचे लागेसंबंध कसे जुळून आले व लग्नाळू किती मुलांना गंडा घातला याची चौकशी पोलीस करीत आहेत.
आष्टी तालुक्यातील शिराळ येथील तरुणाकडून विवाहापूर्वी ८० हजार रुपये घेऊन ९ मार्च रोजी विवाह केला. त्यानंतर या रॅकेटमधील अजय चवळेचा फोन सोनाली काळे हिला आला. या फोनवरील संभाषण विवाहित तरुणाने ऐकल्याने तो सावध झाला. तरुणाला नांदण्यासाठी यातील महिलेने २ लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास मला फसवून लग्न करून बलात्कार केला असा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणाने पोलिसात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी वसूल करताना दोघांना रंगेहात पकडले. प्राथमिक चौकशीत ८ जणांशी या एकाच महिलेने विवाह केल्याचे निष्पन्न झाले आहे. या रॅकेटमध्ये किती जणांचा सामावेश आहे. अजून असे किती मामा आहेत. या रॅकेटचे किती लग्नाळू तरूण बळी ठरलेत याचा तपास पोलीस करत आहेत. शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असून या पथकामध्ये पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे, पोलीस हवालदार बन्सी जायभाय,पोलीस शिपाई प्रदीप पिंपळे यांचा समावेश आहे.
प्रेमसंबंधातून एकत्र अन् खंडणीचा शोधला धंदा
यातील आरोपी सोनाली काळे मूळ नांदेडची तर अजय चवळे हा लातूरचा. यांची ओळख होऊन त्याचे नातेसंबंधात रूपांतर झाले. या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांकडून कळते. खर्डा येथील रामा बडे हा लातूरला गेला असता त्याची व अजय चवळेची ओळख झाली. मग त्याला मामा म्हणून मुलीच्या लग्नासाठी मागे उभे करायचे ठरले. त्यांनी या मामाला अजून किती वेळा ‘मामा’ म्हणून उभे केले याचा शोध पोलीस घेत आहेत. हा मामा एका डोळ्याने अंध व दिव्यांग आहे. अजय चवळे हा जास्त वय झालेले व लग्न होत नसलेले लग्नाळू वर शोधायचा आणि सोनाली काळे सोबत विवाह करून द्यायचा. त्यानंतर लाखो रुपये उकळायचा असा धंदा या रॅकेटचा हाेता, अशी माहिती पुढे आली आहे.