तहसीलदार ,पोलीस, मुख्याधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:35 IST2021-04-04T04:35:06+5:302021-04-04T04:35:06+5:30
माजलगाव : कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना तहसीलदार, पोलीस व मुख्याधिकाऱ्यात समन्वयाचा अभाव असल्याने शहरात कोणाचा कोणाला ...

तहसीलदार ,पोलीस, मुख्याधिकाऱ्यांत समन्वयाचा अभाव
माजलगाव : कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असताना तहसीलदार, पोलीस व मुख्याधिकाऱ्यात समन्वयाचा अभाव असल्याने शहरात कोणाचा कोणाला मेळ लागत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून ॲन्टिजेन टेस्ट न करता बिनधास्तपणे दुकाने उघडी असून नागरिक दिवसभर विनामस्क फिरत आहेत. त्यांच्यावर कोणाचाच अंकुश राहिलेला नसून हे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतांना दिसत आहेत.
सध्या बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून माजलगाव तालुक्यातही या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या दहा दिवसांचा लॉकडाऊन सुरू असून या काळात मोठ्या प्रमाणावर निर्बंध लावण्यात आले आहेत. ॲन्टिजेन टेस्ट न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तसेच रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांवर नगरपालिकेच्या नेमलेल्या पथकाने कारवाया करणे आवश्यक असतांना ८-१० दिवसांत एखाददुसरी थातुरमातुर कारवाई केली जात आहे. यावर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा अंकुश दिसून येत नाही. दुकाने नियमानुसार वेळीच बंद करणे आवश्यक असतांना व दिवसभर रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे आवश्यक असतांना पोलीस मात्र नगरपालिकेच्या नावाने ओरडताना दिसत आहेत. तर येथील तहसीलदारांकडे माजलगावसह वडवणीचा पदभार असल्याने या ठिकाणी तहसीलदार आहेत की नाही हेच कळेना. तहसीलदार, पोलीस विभाग व मुख्याधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत असल्याने लॉकडाऊनच्या काळात शहरात लॉकडाऊन आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विनामास्क फिरणारे नागरिक, कारवाया न होणे, शिथील वेळेनंतरही उशिरापर्यंत दुकाने उघडी राहणे या बाबतीत विचारणा केली असता संबंधित विभागाला कळवण्यात येईल असे ठरावीक उत्तर देत तहसीलदार टाळाटाळ करताना दिसत आहेत.
नगरपालिकेने पथक नेमलेले असताना ते रस्त्यावर नाहीत. पोलिसांची संख्या कमी असताना होमगार्डना सोबत घेऊन केवळ पोलीसच रस्त्यावर आहेत. नगर परिषदेने नेमलेल्या पथकाबाबत मुख्याधिकाऱ्यांना कळविले जाईल.
--धनंजय फराटे ,पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे.