भाज्यांना कवडीमोल भाव, त्यावर कोरोनाचा घाव - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:53+5:302021-03-13T04:58:53+5:30
माजलगाव : तालुक्यात मागील ३-४ महिन्यात ग्राहकांअभावी भाजीपाल्याचे भाव कवडीमोल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तो भाजीपाला काढायला ...

भाज्यांना कवडीमोल भाव, त्यावर कोरोनाचा घाव - A
माजलगाव : तालुक्यात मागील ३-४ महिन्यात ग्राहकांअभावी भाजीपाल्याचे भाव कवडीमोल झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तो भाजीपाला काढायला देखील परवडत नसतानाच कोरोनामुळे आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.
गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने शेतातील विहीर व बोअर तुडुंब भरून वाहू लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी वेळेत उत्पन्न मिळावे म्हणून मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली होती. यामुळे मागील ३-४ महिन्यांपासून बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे भाव गडगडलेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील भाजीपाला काढायचा खर्चदेखील निघणे अवघड झाले आहे.
तालुक्यात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्याने व पाहिजे त्याप्रमाणात ग्राहक नसल्याने भाजीपाल्यांचे भाव गडगडलेले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची उपजीविका भाजीपाल्यावरच आहे त्यांचे सध्या बेहाल झालेले दिसून येत आहे. त्यातच पुन्हा कोरोनामुळे तालुक्यातील सर्वच ठिकाणचे आठवडी बाजार बंद केल्याने शेतात आलेला भाजीपाला कोठे विकावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादित भाजीपाला काढून बांधावर फेकल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्यायच उरलेला नाही. यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
-------
मागील ३-४ महिन्यात वांगे २० रुपये, दोडका २५ ते ३०, शेवगा ३०, टोमॅटो ५ , मेथी १०,पालक १०, गाजर २०, शेपू-चुका २०,लसूण ६०, कांदे ३०, पत्ता व फुल कोबी १०, कोथिंबीर २० रुपये किलो भावाने विकला जात आहे.
अगोदरच भाजीपाल्याला भाव नसल्याने आमचा खर्च निघणे मुश्कील झाले होते. व सध्या कोरोनामुळे आठवडी बाजार बंद असल्याने आम्हाला शेतातील भाजीपाल्यांचे काय करायचे हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला भाजीपाला विक्रीसाठी जागा व वेळ ठरवून दयावा, त्यामुळे आमचे नुकसान होणार नाही.
--- लक्ष्मण राऊत, भाजीपाला उत्पादक शेतकरी,उमरी