कोल्हापूर-नागपूर विशेष रेल्वे परळीमार्गे धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:33 IST2021-03-05T04:33:47+5:302021-03-05T04:33:47+5:30
परळी : कोल्हापूर-नागपूर ही विशेष रेल्वे आठवड्यातून दोन वेळा परळीमार्गे धावणार आहे. शुक्रवारी कोल्हापूर येथून निघून शनिवारी रात्री ...

कोल्हापूर-नागपूर विशेष रेल्वे परळीमार्गे धावणार
परळी : कोल्हापूर-नागपूर ही विशेष रेल्वे आठवड्यातून दोन वेळा परळीमार्गे धावणार आहे. शुक्रवारी कोल्हापूर येथून निघून शनिवारी रात्री १२.३० वाजता परळी रेल्वे स्थानकात येईल. तर परळीहून नागपूरकडे १२.४० वाजता मार्गस्थ होणार आहे.
मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर-नागपूर ही रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. तीच रेल्वे आता ६ मार्चपासून धावणार आहे. कोल्हापूर येथून निघून ही रेल्वे मिरज, पंढरपूर, कुर्डुवाडी, बार्शी, उस्मानाबाद लातूर, परळी मार्गे परभणी, पूर्णा हिंगोली, वाशिम, आकोला, बडनेरा वर्ध्याहून नागपूरला जाईल व परत नागपूरहून ही रेल्वे परळी मार्गे कोल्हापूरकडे जाईल. नागपूरहून आठवड्यातून शनिवारी व मंगळवारी निघून परळीत रविवारी व बुधवारी येईल. यामुळे रेल्वे प्रवाशांची सोय होणार आहे.
तसेच औरंगाबाद-रेणीगुंटा ही रेल्वे आठवड्यातून एकदा ३ एप्रिलपासून धावणार आहे. औरंगाबाद, परभणी, परळी, बिदर, विकाराबाद, गुंदकल, गुत्तीमार्गे रेणुगंटाला जाईल. या रेल्वेगाडीमुळे तिरुपती बालाजीला जाणाऱ्या भक्तांची सोय होणार आहे. परळीमार्गे ही रेल्वे पुन्हा सुरू होत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा, सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर व परळी न. प. शिक्षण समिती सभापती गोपाळराव आंधळे आदींनी स्वागत केले आहे.
परळीतून जाणाऱ्या प्रवाशांची सोय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिने बंद झालेल्या रेल्वे आता सुरू झाल्याने प्रवाशांची सोय होत आहे. शिर्डी- काकिनाडा, काकिनाडा-शिर्डी, बंगळरू-नांदेड, औरंगाबाद- हैद्राबाद, पनवेल-नांदेड या विशेष रेल्वे गाडया सुरू झाल्या आहेत. तसेच आठवड्यातून एकदा कोल्हापूर -धनबाद ही रेल्वे सुरू झाली आहे त्यानंतर आता कोल्हापूर-नागपूर ही आठवड्यातून दोन दिवस रेल्वे गाडी सुरू होत आहे. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत केले आहे.