कारवाईच्या मांजात अडकला पतंग विक्रेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:50 IST2021-01-08T05:50:28+5:302021-01-08T05:50:28+5:30
पतंग विक्रेत्याला कारवाईचा मांजा अंबाजोगाई : नायलॉन मांजावर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरीही अद्यापही मांजाची विक्री ...

कारवाईच्या मांजात अडकला पतंग विक्रेता
पतंग विक्रेत्याला कारवाईचा मांजा
अंबाजोगाई : नायलॉन मांजावर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरीही अद्यापही मांजाची विक्री सुरूच आहे. अंबाजोगाई पोलिसांनी याकामी सकारात्मक भूमिका घेत मांजा विक्रेत्यांना लगाम घालण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी शहर पोलिसांनी बेकायदेशीरपणे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एकास रंगेहात पकडून त्याच्याकडून पाचशे रुपयांचा मांजा जप्त केला.
मांजामुळे मानव आणि पक्ष्यांच्या जीवितास असणारा धोका लक्षात घेता मांजा विक्रेत्यांसोबतच खरेदी करणाऱ्या आणि पतंग उडविण्यासाठी त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्याला अनुसरून अंबाजोगाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी मांजा विक्रेत्यांचा शोध घेण्याचा आदेश कर्मचाऱ्यांना दिला होता. पोलिसांनी खबऱ्यांना कामी लावल्यानंतर शहरातील बंकटगल्ली भागातील शाहीनिवास मिरची कांडपमधून बेकायदेशीरपणे नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. खातरजमा झाल्यानंतर बुधवारी ११.३० वाजता पोलिसांनी सदर मिर्ची कांडपवर छापा मारला. यावेळी तिथे नूर अस्लम रसूल शेख (रा. मंगळवार पेठ, अंबाजोगाई) हा मांजा विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीचा मांजा जप्त करून त्याच्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार कार्यवाही केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. विठ्ठल कुंडगीर, सांगळे, पो.ना. डाके यांनी केली.