केसापुरी कॅम्पच्या कोविड सेंटरमध्ये घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST2021-05-24T04:32:19+5:302021-05-24T04:32:19+5:30

पुरुषोत्तम करवा लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : तालुक्यातील केसापुरी कॅम्प येथे चालू असलेल्या शासकीय कोविड सेंटरमध्ये मागील पाच दिवसांपासून ...

Kingdom of Dirt in the Covid Center of Kesapuri Camp | केसापुरी कॅम्पच्या कोविड सेंटरमध्ये घाणीचे साम्राज्य

केसापुरी कॅम्पच्या कोविड सेंटरमध्ये घाणीचे साम्राज्य

पुरुषोत्तम करवा

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : तालुक्यातील केसापुरी कॅम्प येथे चालू असलेल्या शासकीय कोविड सेंटरमध्ये मागील पाच दिवसांपासून स्वच्छताच न केल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसून येत आहेत. यामुळे कोविड सेंटरमध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

ज्या कोरोना रुग्णांमध्ये कोरोनाची कमी लागण आहे, अशा रुग्णांवर येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. येथे ४ ते ५ ठिकाणी या रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी जवळपास ३०० रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी आतमधील स्वच्छता ही आरोग्य विभागाकडून केली जाते. या ठिकाणची सर्व घाण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येते. ही घाण उचलण्याचे काम हे नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून केले जाते. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून मागील पाच दिवसांपासून या ठिकाणचा कचरा उचलण्यात आला नाही. यामुळे येेथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे, तर डासांचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे.

अगोदर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण परेशान असताना या घाणीच्या दुर्गंधीमुळे आणखी काही आजार आपल्या मागे लागणार तर नाही ना, अशी भीती रुग्णांमध्ये पसरली आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना अनेकांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणतात, हे आमचे काम नसून नगरपालिकेचे काम असल्याचे सांगतात. यामुळे याबाबत बोलायचे कोणाला, असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

-----

नगरपालिकेचे स्वच्छता अभियंता

जगदीश जाधवर यांना याबाबत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मागील पाच दिवसांपासून फोन बंदच आहे. त्यांच्याशी संपर्कच होत नसल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर जाधवर यांची मनमानी सुरू असल्याने असे प्रकार होत असल्याचे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

---

शासकीय कोविड सेंटरमधील स्वच्छतेचे काम आम्ही इतरांकडून करून घेत आहोत, पण जी घाण गोळा करून ठेवण्यात आली आहे ती उचलण्याचे काम नगरपालिकेचे आहे. पाच दिवसांपासून ही घाण नगरपालिकेकडून उचलली गेली नाही.

- डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी, माजलगाव

...

स्वच्छता करणाऱ्या ठेकेदाराने नगरपालिकेस न कळवता अचानक तीन दिवसांपासून स्वच्छतेचे काम बंद केले होते. त्यांना नोटीस बजावल्यानंतर त्याने परत स्वच्छतेला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोविड सेंटरमधील कचरा उचलता आला नाही. सोमवारपासून सर्व काही सुरळीत होईल.

- शेख मंजूर, नगराध्यक्ष, माजलगाव

===Photopath===

230521\purusttam karva_img-20210523-wa0029_14.jpg

===Caption===

केसापुरी कॅम्पच्या कोविड सेंटरमध्ये साचलेला कचरा.

Web Title: Kingdom of Dirt in the Covid Center of Kesapuri Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.