मुलांनो, निरोगी दातांसाठी चॉकलेट्स खाणे टाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:04+5:302021-08-28T04:37:04+5:30
बीड : अलीकडच्या काळात अतिगोड पदार्थ आणि चॉकलेट खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे लहान मुलांमध्येही दातांचे आजार समोर येत आहेत. शरीरासाठी ...

मुलांनो, निरोगी दातांसाठी चॉकलेट्स खाणे टाळा !
बीड : अलीकडच्या काळात अतिगोड पदार्थ आणि चॉकलेट खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे लहान मुलांमध्येही दातांचे आजार समोर येत आहेत. शरीरासाठी फायदेशीर असलेले चॉकलेट अतिसेवन केले तर ते आरोग्याच्या दृष्टीने नुकसानीकारकच आहे. त्यामुळे चॉकलेट न खाल्लेलेच बरे.
लहान असो वा मोठे चॉकलेट सर्वांचेच आवडते आहे. साध्या गोळीपासून ते विविध आकारातील चॉकलेट सेलिब्रेशनमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात. चॉकलेटमुळे शरीराला ऊर्जा मिळते. परंतु, जास्त प्रमाणात चॉकलेट खाल्ल्याने दात खराब होतात. दातांना कीड लागते. शरीराची चरबी वाढते. कफ, मधुमेह होतो, असेही ऐकायला मिळाते. चॉकलेटमधील कॅफिनसारखे घटक पदार्थ कॅलरी वाढवित असले तरी ते प्रमाणातच खाणे चांगले ठरेल. जर चॉकलेट खाल्ले तर नंतर योग्य पद्धतीने ब्रशिंग करून दातांची स्वच्छता राखणे हिताचे ठरेल, असे दंतरोग तज्ज्ञ सांगतात.
चॉकलेट्स न खाल्लेलेच बरे !
वयोमानाच्या तुलनेत मुलांमध्ये जास्त प्रमाणात चॉकलेट खाण्यात येते. त्यामुळे चॉकलेटमधून मिळणाऱ्या अतिरिक्त कॅलरीजमुळे असंतुलन होऊन कफ, सर्दीसारखे आजार बळावू शकतात. यातच निरोगी दातांसाठी चॉकलेट खाणे मुलांनी टाळण्याची गरज आहे. चॉकलेट- बिस्कीट खाण्याचे प्रमाण कमी असावे. यातील शुगरमुळे दातांना लवकर कीड लागते. स्टिकी चॉकलेट खाऊ नये.
अशी घ्या दातांची काळजी
चॉकलेट खाल्ल्यानंतर ब्रशने दात स्वच्छ करायला हवे. मुलांनी जंकफूड, चॉकलेट टाळले पाहिजे. पालकांनीही काळजीपूर्वक लक्ष द्यावे. रात्री दूध पिल्यानंतर ओठांखाली काहीअंशी ते जमा होते. ओल्या व सुक्या कपड्याने दात पुसून घ्यावेत. फ्लोराईड पेस्टने ब्रश करावे. दीड वर्षापर्यंत दात येऊ लागल्याचे दिसताच ब्रशिंग सुरू करावे.
लहानपणीच दातांना कीड
गोड किंवा चॉकलेट्स खाल्ल्याने लहानपणीच कोवळ्या दातांना कीड लागण्याची शक्यता जास्त असते. दातांना चिकटणारे चॉकलेट खाल्ल्यास त्यातून पुढे कीड लागते. त्याचा परिणाम येणाऱ्या पक्क्या दातांवरही होतो. मुले रात्री झोपताना त्यांच्या तोंडात दूध अथवा अन्नकण राहिल्यास कीड लागण्याचा धोका असतो. दीड ते अकरा वर्ष वयोगटातील मुलांमध्ये चॉकलेटमुळे दातांना कीड लागण्याचे प्रमाण कमालीचे आहे.
दोन दंतरोग तज्ज्ञाचा कोट
मुलांनी चाॅकलेट कमी प्रमाणात खावे. त्यांनी ब्रश करणे गरजेचे आहे. पेस्टपेक्षा मुलांनी दोन वेळा ब्रश करणे आवश्यक आहे. बाजारात मिळणाऱ्या चांगल्या प्रतीच्या फिंगर ब्रशने आईने मुलांच्या दातांची स्वच्छता करावी. दातांना चिकटणारे चाकॅलेट खाण्याचे टाळावे. - डॉ. धनराज वाघमारे, दंत चिकित्सक, बीड.
-----------
लहान मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण वाढत आहे. दातांची निगा राखणे आवश्यक आहे. चॉकलेट, बिस्कीट वारंवार न देता त्यासाठी ठरावीक दिवस ठरवून त्याच दिवशी द्यावे. पालकांनी दातांची स्वच्छता राखण्यासाठी मुलांकडून वेळोवेळी ब्रश करून घ्यावे. - डॉ. प्रवीण ढगे, दंत चिकित्सक, बीड.
----------