पालख्या डोंगरावरील खंडोबा मंदिर विकासापासून वंचित - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:35 IST2021-08-23T04:35:22+5:302021-08-23T04:35:22+5:30
सखाराम शिंदे / लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : तालुक्यातील गोविंदवाडी जवळील पालख्या डोंगरावरील खंडोबा मंदिर आहे. या मंदिराचा परिसर ...

पालख्या डोंगरावरील खंडोबा मंदिर विकासापासून वंचित - A
सखाराम शिंदे / लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : तालुक्यातील गोविंदवाडी जवळील पालख्या डोंगरावरील खंडोबा मंदिर आहे. या मंदिराचा परिसर गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिला आहे. या ठिकाणी भाविकांना कसल्याच सुविधा उपलब्ध नाहीत. याला कारण लोकप्रतिनिधींची उदासीनता आहे. सदर खंडोबा मंदिर तालुक्याचे ग्रामदैवत समजले जाते. गेवराई शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पालख्या डोंगरावर श्री खंडोबा मंदिर देवस्थान आहे. हे मंदिर पुरातन असून दगडी बांधकाम असलेले आहे. मंदिरावरील कळसाचे कोरीव काम केलेले असल्याने अतिशय मनमोहक दिसते. समोरच भव्य असे दगडी प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या समोरच नवीन सभामंडप बांधलेला आहे. चारही बाजूने संरक्षण भिंत आहे. मंदिरासमोरच भव्य अशी दीपमाळ भाविकांचे लक्ष वेधून घेते. मंदिरात दगडी पाषाणाची खंडोबाची मूर्ती आहे. समोरच भैरवनाथांची मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस दगडी असे पुरातन महादेव मंदिर आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून मंदिर व परिसराचा कसलाच विकास झाला नसल्याने येथे येणाऱ्या भाविकांचे मोठे हाल होत आहेत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. विजेची सोय नाही. परिसराचे सुशोभीकरण नाही. डोंगरावर कच्चा रस्ता असल्याने पावसाळ्यात चिखलच चिखल होतो. या ठिकाणी चंपाषष्टीला तीन दिवस मोठी यात्रा भरत असते. मात्र गेल्या वर्षी कोरोनामुळे ही यात्रा भरली नाही. याही वर्षी यात्रा भरते की, नाही यात शंकाच आहे. शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे पर्यटन स्थळच आहे. तरी या मंदिर परिसराचा विकास करावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, दत्ता दाभाडे, जयसिंग माने, भागवत दहिवाळ, शुभम टाक यांनी केली आहे.
..... पुरातन भुयाराचे आकर्षण
पालख्या डोंगरावर खंडोबा मंदिराजवळच पुरातन असे भुयार आहे. हे भुयार या डोंगरावरून ते तलवाडा येथील त्वरित देवी मंदिर येथे निघते असे येथील वयोवृद्ध नागरिक सांगतात. मात्र या भुयाराचे पुरातत्व विभागाच्या वतीने संशोधन व्हावे, अशी मागणी मन्यारवाडी येथील नागरिक मदनराव निकम, गजानन चौकटे यांनी केली आहे.
210821\553420181121_114329_14.jpg~210821\553420181121_114133_14.jpg
गेवराई तालुक्यातील पालखया डोंगरावरील पुरातन खंडोबा मंदिर.~