बीड : ‘राजकारणात तू फार मध्ये-मध्ये का करतोस’ असे म्हणत कर्जणी येथील एका युवकावर कत्ती, तलवारीने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील कर्जणी फाट्यावर घडली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जणी येथील गणेश विश्वनाथ साबळे या युवकाला कर्जणी फाटा येथे ते कर्जणी रोडवर थांबवून ‘राजकारणात तू फार मध्ये-मध्ये का करतोस’ असे म्हणत शुभम हनुमान बागलाने (रा. काकडहिरा), अमोल श्रीराम कदम (रा. कर्जणी) सुशांत कल्याण सपकाळ, रवींद्र कल्याण सपकाळ यांनी गंभीर मारहाण करत कत्ती आणि चाकूने त्याच्यावर वार केला. यात तो गंभीर जखमी झाला या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गणेश साबळे यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपीविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत हे करीत आहे.