बीड शहरातील ग्रामदैवत कोरडे गणपती मंदिराचे कलशारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:37 IST2021-08-28T04:37:39+5:302021-08-28T04:37:39+5:30
बीड : शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळे गल्ली येथील श्रीक्षेत्र कोरडे गणपती मंदिराचा कलशारोहण सोहळा सुरेश ...

बीड शहरातील ग्रामदैवत कोरडे गणपती मंदिराचे कलशारोहण
बीड : शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळे गल्ली येथील श्रीक्षेत्र कोरडे गणपती मंदिराचा कलशारोहण सोहळा सुरेश महाराज भानुदास साडेगावकर यांच्या हस्ते पार पडला.
शहरातील श्रीक्षेत्र कोरडे गणपती मंदिराचा मागील काही वर्षांपासून जीर्णोद्धार सुरू आहे. मंदिराचे विश्वस्त प्रा. जगदीश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे काम पूर्णत्वास आले आहे. कलशारोहणानिमित्त तीन दिवसांपासून येथे विविध धार्मिक विधी पार पडले आहेत. गणेश पूजन, अग्नी स्थापना करून गणेश यागाला सुरुवात करण्यात आली. श्री गणेशाला सहस्रावर्तन करण्यात आले. २६ ऑगस्ट रोजी गणेशयाग आणि कलश पूजन करून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, ज्येष्ठ विधिज्ञ कालिदास थिगळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी विलास बडगे, दिनकर कदम, अरुण डाके, सखाराम मस्के, नवनाथ कुलकर्णी, गोरख धन्ने, नगरसेवक राजेंद्र काळे आदी उपस्थित होते. शुक्रवारी साडे भोगलगाव येथील मठाधिपती सुरेश महाराज भानुदास यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा झाला. ब्रह्मवृद्धांच्या मंत्रघोषात आणि भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमास कोरोनाचे नियम पाळत भाविकांनी उपस्थिती दर्शवली. कलशारोहणानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. या सर्व कार्यक्रमाचे पौराेहित्य आदित्य नंदकुमार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रशेखर भोगे, मिथुन निर्मळ, वैभव सुलाखे, प्रसाद कुलकर्णी, अनिकेत दाणी, प्रथमेश शेटे, श्यामसुंदर मुळे, गणेश बुवा जोशी आणि कुणाल जोशी यांनी केले.