केज/लातूर: बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश अण्णासाहेब गिड्डे (वय ३२) यांचा गुरुवारी पहाटे लातूर जिल्ह्यातील रेणापूर शिवारात झालेल्या भीषण कार अपघातात जागीच मृत्यू झाला. कारचे टायर फुटल्याने नियंत्रण सुटून वाहन एका झाडावर आदळले आणि सुमारे ५०० फूट अंतरापर्यंत पलट्या खात गेले. या भीषण अपघातात एका उमद्या आणि संवेदनशील अधिकाऱ्याचा अंत झाल्याने संपूर्ण महसूल विभाग आणि मराठवाड्यात शोककळा पसरली आहे.
अपघाताचा थरार: एअरबॅग्ज फुटल्या, कारचा चक्काचूरतहसीलदार गिड्डे हे स्वतः कार (MH-10-DQ-9895) चालवत लातूरकडून केजकडे येत होते. रेणापूरजवळच्या धोक्याच्या वळणावर त्यांच्या कारचे टायर अचानक फुटले. कार रस्त्यालगतच्या एका बाभळीच्या झाडाला इतक्या वेगाने धडकली की ते झाड मुळासकट उखडून पडले. धडकेनंतर कारने अनेक पलट्या खाल्ल्या, ज्यात इंजिनचे भाग ५०० फूट दूर फेकले गेले. कारमधील एअरबॅग्ज उघडल्या खऱ्या, पण धडकेच्या तीव्रतेमुळे त्याही फाटल्या आणि गिड्डे यांचा जागीच प्राण गेला.
शून्य ते तहसीलदार: एक प्रेरणादायी प्रवाससांगली जिल्ह्यातील एरंडोली येथील एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात राकेश गिड्डे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील अण्णासो गिड्डे हे खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करायचे. कष्टाच्या भाकरीवर शिकून राकेश २०१९ मध्ये तहसीलदार झाले. २०२४ मध्ये केजमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी 'शिव रस्ते' आणि 'पांदण रस्ते' या कामांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मनावर राज्य केले. बांधावर जाऊन प्रश्न सोडवणारा अधिकारी अशी त्यांची अल्पावधीत ओळख निर्माण झाली होती.
अर्ध्यावर मोडला संसारराकेश गिड्डे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण, भाऊ आणि अवघ्या दीड वर्षाची चिमुकली मुलगी असा परिवार आहे. पत्नी आजारी असल्याने त्या सांगलीला होत्या, त्यामुळे गिड्डे मित्राची कार घेऊन दोन दिवसांपूर्वीच केजला आले होते. एका ऊसतोड कामगाराच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नुकताच घेतलेला पुढाकार त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देणारा ठरला. त्यांच्या जाण्याने प्रशासनातील एक प्रामाणिक अधिकारी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
Web Summary : Kej Tehsildar Rakesh Gidde died in a car accident near Renapur, Latur, after a tire burst caused his car to crash into a tree. The vehicle overturned multiple times, resulting in fatal injuries. Gidde, known for his dedication to farmers, leaves behind a grieving family.
Web Summary : केज के तहसीलदार राकेश गिड्डे की लातूर के पास रेनापुर में टायर फटने से कार दुर्घटना में मृत्यु हो गई। गाड़ी पेड़ से टकराकर कई बार पलटी। किसानों के प्रति समर्पित गिड्डे के परिवार में शोक की लहर है।