आदर्श भारत निर्मितीसाठी कबीरवाणी महत्त्वपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST2021-06-25T04:23:44+5:302021-06-25T04:23:44+5:30
बीड : भारताला जर खरच एक आदर्श देश निर्माण करायचा असेल तर कबीरवाणीतील विचार खूपच महत्त्वपूर्ण ठरतील, असे प्रतिपादन ...

आदर्श भारत निर्मितीसाठी कबीरवाणी महत्त्वपूर्ण
बीड : भारताला जर खरच एक आदर्श देश निर्माण करायचा असेल तर कबीरवाणीतील विचार खूपच महत्त्वपूर्ण ठरतील, असे प्रतिपादन व्याख्यात्या अर्चना सानप यांनी केले. येथील विचारवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कार्यालयात संत कबीर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून औषधनिर्माण अधिकारी प्रियंका जाधव उपस्थित होत्या.
अर्चना सानप म्हणाल्या, संत कबीर यांनी संपूर्ण आयुष्य मानव कल्याणासाठी प्रयत्न केले. कबीरवाणीमध्ये बरेचसे प्रसंग आजच्या काळातही अनुकूल आहेत. संत कबीर एक महान क्रांती असलेले विचारवंत म्हणून नेहमी लक्षात राहतात. सध्या जगात फक्त भारतातच नाही तर विविध देशांमध्ये त्यांच्या रचनांवर वेगवेगळ्या प्रकारे शोध सुरू आहेत. आज समाजात जी अशांतता, गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे ती दूर करण्यासाठी संत कबीर यांचे आदर्श एक अनमोल ठेवा आहे. त्यादृष्टीने कबीर यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा प्रत्येक सामान्य व्यक्तीने प्रयत्न केला पाहिजे. संत कबीर यांचा जन्म अशा काळात झाला की, त्यावेळी सर्व जग हे अशांतीने ग्रासले होते. त्यांनी आपल्या विचारांनी पूर्ण जगात शांती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संत कबीर यांचा प्रामुख्याने सामाजिक न्यायावर आधारित समाजाच्या निर्मितीवर भर दिला व लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यावर भर दिला. याची आजच्या काळातही आवश्यकता आहे, असे मत सानप यांनी व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पंडित यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी प्रल्हाद वाघमारे, पांडुरंग पंडित, दिलीप वाघमारे, किशोर पंडित, कुणाल जाधव, अमोल पंडित, आदी उपस्थित होते.