कोरोना असेपर्यंतच नोकरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST2021-03-07T04:30:32+5:302021-03-07T04:30:32+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात कंत्राटी पद्धतीने तीन महिन्यांसाठी भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना कोरोना असेपर्यंतच नोकरी करावी लागणार आहे. काहींना नव्याने ...

कोरोना असेपर्यंतच नोकरी!
बीड : जिल्ह्यात कोरोनाकाळात कंत्राटी पद्धतीने तीन महिन्यांसाठी भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना कोरोना असेपर्यंतच नोकरी करावी लागणार आहे. काहींना नव्याने आदेश दिले जात आहेत, तर काहींना कमी केले जात असल्याचे दिसते. परंतु, आता रुग्णसंख्या वाढत असल्याने कंत्राटी भरती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु, ही नोकरी कोरोना असेपर्यंतच राहणार आहे. हे सर्व कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत.
गतवर्षी ८ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली होती. त्यानंतर, महिनाभर जिल्ह्याची पाटी कोरी राहिली. पुन्हा १६ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या रुग्णाची नोंद झाली आणि नंतर काेरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. वाढती रुग्णसंख्या पाहता कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या केंद्रांमध्ये उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने शिपायापासून ते डॉक्टरपर्यंतची पदे कंत्राटी पद्धतीने भरली. त्यांना तीन महिन्यांसाठी आदेशही दिले. मागील दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने यातील ५० टक्के कर्मचारी कमी करण्यात आले. परंतु, आता रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोविड केअर सेंटर सुरू करण्यासह कंत्राटी भरती करण्याचा विचार आरोग्य विभाग व प्रशासन करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. परंतु, याबाबत अधिकाऱ्यांनी बोलण्यास टाळले.
कायम करण्यासाठी आंदोलने
कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावलेल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातील भरतीत प्राधान्य द्यावे. रिक्त किंवा नवी पदे भरताना अगोदर विचार करावा, यासाठी बीडमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनही केले होते. मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना निवेदनेही दिली होती. परंतु, त्यांना आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही.
आकडे काय बोलतात...
एकूण कोरोनाबाधित रुग्ण - १९,११६
एकूण कोरोनामुक्त - १८,१४२
एकूण बळी - ५८५
कोरोनासाठी राखीव सरकारी आरोग्य संस्था - ५
खासगी रुग्णालये - ४.