अंबाजोगाईत सोने उजळून देण्याच्या बहाण्याने सव्वाचार लाखाचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 14:10 IST2018-02-15T14:09:23+5:302018-02-15T14:10:19+5:30

सोन्याचे दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील सव्वा चार लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी शहरातील चौसाळकर कॉलनी येथे घडली.

jewelery of 4 lac rupees stolen at ambajogai | अंबाजोगाईत सोने उजळून देण्याच्या बहाण्याने सव्वाचार लाखाचे दागिने लंपास

अंबाजोगाईत सोने उजळून देण्याच्या बहाण्याने सव्वाचार लाखाचे दागिने लंपास

अंबाजोगाई( बीड ) : सोन्याचे दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील सव्वा चार लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी शहरातील चौसाळकर कॉलनी येथे घडली. या प्रकरणी दोघां विरोधात गुन्हा दाखल आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

येथील चौसाळकर कॉलनी भागात राहणाऱ्या दिपाली दिनकर कुलकर्णी यांच्या घरी दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दोन भामटे आले. आम्ही मुंबई येथील कंपनीकडून आलो असून रासायनिक पावडरच्या साह्याने भांडे उजळून देण्याचे काम करतो अशी बतावणी त्या दोघांनी केली. कुलकर्णी यांनी त्यांना नकार दिला असतानाही एकदा तरी वापरून पहा असे म्हणत त्या दोघांनी बळजबरीने त्यांना घरातील कुकर आणावयास लावले आणि त्यांच्या हातावर उग्र वास येणारी तपकिरी रंगाची थंड पावडर ठेवली. कुकर साफ करून झाल्यानंतर त्या दोघांनी तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने देखील उजळून देऊ असे सांगतिले. याला भुलून कुलकर्णी यांनी गळ्यातील सोन्याचे ५ तोळ्याचे गंठन आणि १० तोळ्याच्या बांगड्या व गोट असे एकूण ४ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने त्यांच्याकडे दिले. सदरील दागिने एका डब्यात ठेवल्यासारखे करत भामट्यांनी डब्यात पावडर आणि पाणी टाकले. तो डब्बा कुलकर्णी यांच्या हातात देत थोड्यावेळाने उघडून पाहण्यास सांगितले आणि ते निघून गेले. 

थोड्यावेळाने कुलकर्णी यांनी डब्बा उघडून पहिला असता त्यात दागिने नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून घेत भामट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते आढळून आले नाहीत. अखेर त्यांनी सायंकाळी अंबाजोगाई शहर पोलिसात तक्रार दिली. दिपाली कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञात भामट्यांवर कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक गजानन तडसे हे करत आहेत.

Web Title: jewelery of 4 lac rupees stolen at ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.