डोंगरकिन्ही जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:33 IST2021-04-11T04:33:05+5:302021-04-11T04:33:05+5:30
डोंगरकिन्ही येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पटसंख्या आहे. डोंगरकिन्ही आणि जवळपास १२ वाड्यातील विद्यार्थी येथे शिक्षण ...

डोंगरकिन्ही जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी
डोंगरकिन्ही येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पटसंख्या आहे. डोंगरकिन्ही आणि जवळपास १२ वाड्यातील विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात. शाळेची इमारत जुनी झालेली असल्याने येथील अनेक विद्यार्थ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी प्रवेश घेतले होते परिणामी शाळा मोडकळीस येते की काय अशी शंका होती. त्यामुळे या शाळेची नवीन इमारत होणे आवश्यक होते. यासाठी डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटाचे सदस्य ॲड. प्रकाश कवठेकर हे आ. सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करत होते. या शाळेला नवीन इमारत मिळावी, यासाठी ग्रामस्थांकडूनही वारंवार मागणी होत असे. या ठिकाणी खासगी शिक्षण संस्था नसून जिल्ह्यात सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जाते.
२०१७ पासून इमारतीसाठी पाठपुरावा सुरू होता. २०२० मध्ये या शाळेसाठी १ कोटी १० लक्ष रुपये निधी मंजूर केला होता. परंतु, जागेअभावी तो निधी परत गेलेला होता. यावर्षी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिलेली असल्याने लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. इमारत होणार असल्याने पुन्हा एकदा या शाळेला गतवैभव प्राप्त होणार आहे. शाळेला जागा उपलब्ध करून देण्यासाठी गावाने एकी दाखवून हा प्रश्न लावला. शाळेचा विकास व्हावा, अशी गावाची कायम तळमळ दिसून येत आहे.
डोंगरकिन्ही जि.प.माध्यमिक शाळेचा प्रश्न जुना होता. जि. प. गटातील शाळेचे रूपडे पालटावे, अशी इच्छा असल्याने जे- जे करता येईल, ते -ते करत आहे. आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांचा कायापालट करण्याचा मानस आहे. डोंगरकिन्ही शाळेचा प्रश्न मार्गी लागल्याचे मोठे समाधान आहे. ग्रामस्थांची साथ यात अत्यंत महत्त्वाची ठरली.
- ॲड.प्रकाश कवठेकर, जि.प.सदस्य, डोंगरकिन्ही.