एका दुचाकीच्या तपासात सापडल्या १० दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:58+5:302021-07-12T04:21:58+5:30
संतोष स्वामी दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली होती. ...

एका दुचाकीच्या तपासात सापडल्या १० दुचाकी
संतोष स्वामी
दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली होती. दुचाकी चोर सापडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. यातच दिंद्रुड पोलीस हद्दीतील तेलगाव येथे एक दुचाकी शुक्रवारी (दि. ९) चोरीला गेली होती. दिंद्रुड पोलिसांनी याची गंभीर दखल घेत काही तासांतच दुचाकीसह चोरट्यास अटक केली. या प्रकरणाच्या तपासात पुढे चोरीस गेलेल्या १० दुचाकींचा शोध लागला आहे.
तेलगाव येथील दुचाकी चोरीप्रकरणी दिंद्रुड पोलिसांनी गणेश काशीनाथ गायकवाड (रा. पाथरी, जि. परभणी) यास अटक केली. दिंद्रुड पोलीस ठाण्यात आणून त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्याने या दुचाकी चोरीत आणखी काही साथीदार असल्याचे सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजा स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीने दिलेल्या माहितीनुसार व सांगितलेल्या ठिकाणी जाऊन एक-दोन नव्हे तर तब्बल दहा दुचाकी जप्त करून त्या दिंद्रुड पोलीस ठाण्यात लावल्या आहेत.
आरोपीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे विशेष पथकाची नियुक्ती करून रात्रीतून वडवणी येथून एक, पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतून तीन, सोनीमोहा येथून दोन, अंबाजोगाई ठाणे हद्दीतून एक, रायमोहा येथून दोन व अन्य एक अशा तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दिंद्रुडच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांच्यासह त्यांचे सहकारी पीएसआय विठ्ठल शिंदे व अनिल भालेराव, बालाजी सुरेवाड, सरवदे, संजय मुंडे, आदी पोलिसांनी रात्रभर जागरण करून १० दुचाकींसह आरोपी नितीन वसंत मुंडे (रा. पहाडी दहिफळ, ता. धारूर), योगेश सोपान निरडे (रा. कचारवाडी, ता. धारूर), ज्ञानेश्वर सुग्रीव नागरगोजे (रा. वडगाव गुंदा, ता. बीड) या चार आरोपींना अटक केली.
आणखी आठ दुचाकींचा सुगावा
दहा मोटारसायकली जप्त, तर अन्य जवळपास आठ दुचाकींचा सुगावा या आरोपींनी दिंद्रुड पोलिसांना दिला असून या प्रकरणात दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याची शक्यता दिंद्रुड पोलिसांनी वर्तविली आहे. दिंद्रुड पोलीस आरोपींचा कसून तपास करीत दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश करणार असल्याचे दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी सांगितले.
दोघे चोरायचे, दोघे विकायचे
गणेश गायकवाड व नितीन मुंडे हे दुचाकी चोरी करीत होते, तर योगेश निरडे व ज्ञानेश्वर नागरगोजे हे मोटारसायकल विकत असल्याची माहिती दिंद्रुड पोलिसांनी दिली. मोटारसायकल चोरीच्या या प्रकरणात अनेक आरोपी दिंद्रुड पोलिसांच्या हाती लवकरच लागणार असून दिंद्रुड पोलिसांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
110721\img_20210710_174755_14.jpg