इंद्रायणी, चंद्रभागेची भूक भागवली सिंदफणेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:05+5:302021-07-21T04:23:05+5:30
शिरूर कासार : आषाढी एकादशी वैष्णवांची महापर्वणी आणि पायी वारी म्हणजे इंद्रायणीपासून चंद्रभागेपर्यंत वाहणारी अखंड भक्तिधारा, मात्र कोरोनाने या ...

इंद्रायणी, चंद्रभागेची भूक भागवली सिंदफणेने
शिरूर कासार : आषाढी एकादशी वैष्णवांची महापर्वणी आणि पायी वारी म्हणजे इंद्रायणीपासून चंद्रभागेपर्यंत वाहणारी अखंड भक्तिधारा, मात्र कोरोनाने या वारीला आडकाठी आणली असली तरी वारकरी मनाने माऊली ज्ञानोबा तुकोबा सोबत मनाने रोज पायी चालत असल्याची अनुभूती घेत होता. सोमवारी लाखो भाविकांचा सागर पंढरपुरात दाखल होत असतो, तो अवर्णनीय व शब्दातीत असतो. या सर्व आनंदावर विरजण पडले मात्र चंद्रभागा, इंद्रायणीची भूक शिरूरच्या सिंदफणेने भागवली असल्याची प्रतिक्रिया वारकरी देत होते .
मंगळवारी धाकटी अलंकापुरी असलेल्या सिध्देश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी दिंडी प्रदक्षिणेची संकल्पना मांडली व मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पंढरपूर प्रदक्षिणेचा आनंद घेतला. दुधाची तहान ताकावर भागवली. सिद्धेश्वर संस्थानवरून मंगळवारी सकाळी दहा वाजता भगव्या पताका, टाळकरी, विणेकरी, तुळसी वृंदावनासह दिंडी नगर प्रदक्षिणेला निघाली. ती बाजार तळ, गांधी चौक, राममंदिर, जुना वाडा चौक, नगरपंचायत, संभाजी चौक मार्गे स्वस्थानी परतली. संस्थानावरील ज्ञानेश्वर मंदिरापुढे वारीच्या नियमाप्रमाणे ‘भिमा तिरी एक वसविले नगर त्याचे पंढरपूर रे’, ‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे " या अभंगाच्या नादावर फुगडी, पाऊलीचा मनमुराद आनंद लुटला व संकल्पपूर्तीचे समाधान व्यक्त केले गेले.
नगर प्रदक्षिणेत गोविंद पाटील,वि नायक सुतार, ऋषी कानडे, हरिओम क्षीरसागर, बबन पवार, बन्सी सातपुते, ज्ञानदेव बडे, नारायण काटे, भाऊ तळेकर, हरी खोले, पद्माबाई घोरपडे, कौसाबाई राऊत, लता बडे यांच्यासह हरिपाठ महिला मंडळ संस्थानवरील साधक विद्यार्थी असे मोजकेच भाविक सहभागी होते. कोरोना नियमाचे पालन, मास्क व सुरक्षित अंतर या गोष्टींचे भान ठेवले गेले होते. प्रामुख्याने सिंदफणेच्या तीराला चंद्रभागेचे स्वरूप प्राप्त झाले होते. स्वामी विवेकानंद शास्त्री यांच्या आज्ञेवरून रामनाथ कांबळे यांनी संस्थानवर फराळ, प्रसादाची व्यवस्था केली होती.
200721\img-20210720-wa0032.jpg
फोटो