विद्युत रोहित्र, तारांचा वाढला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST2021-07-09T04:22:04+5:302021-07-09T04:22:04+5:30
अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत तारा, खांब आणि रोहित्रांची दुरवस्था झाली आहे. तसेच उघड्या डीपी, वाकलेले ...

विद्युत रोहित्र, तारांचा वाढला धोका
अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत तारा, खांब आणि रोहित्रांची दुरवस्था झाली आहे. तसेच उघड्या डीपी, वाकलेले विद्युत खांब व लोंबकळणाऱ्या विद्युत तारा यापासून ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे.
वीज वितरण कंपनीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील वीज तसेच जीर्ण झालेल्या वीज तारांची दुरुस्ती याकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
मात्र, वीज वितरण कंपनीकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मागील अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले डीपी, वीज तारा व विद्युत पोल यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. जुन्या डोलाऱ्यावरच वीज वितरणाचे काम सुरू असल्याने वारंवार रोहित्रात बिघाड होऊन वीज वितरणात अडचणी येत आहेत. शिवाय लोंबकळणाऱ्या विद्युत तारा सतत उघड्या असणाऱ्या व जमिनीपासून कमी उंचीवर रस्त्यालगत उभारलेल्या डीपी यामुळे लहान मुले, ग्रामस्थ व जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
जुन्या असलेल्या या डीपीमधील किटकॅट खराब झाल्याने वारंवार फ्यूज जाऊन तासन्तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. तरीही महावितरणचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
....
यंत्रसामग्रीवर गंज; वीज प्रवाहात अडथळे
मागील अनेक वर्षांपूर्वी गावात उभारण्यात आलेले विजेचे खांब व वीज तारा अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. डीपीमधील फ्यूज, केबल यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या यंत्रसामग्रीवर गंज चढला असून याठिकाणी तांत्रिक बिघाड होऊन वारंवार केबल जळण्याचे प्रकार सुरू आहेत. पावसाळ्यात त्यावर पाणी पडून विजेच्या ठिणग्या बाहेर पडून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.