Impact of Lokmat: Health Department will soon make a grand appointments in state | राज्यात आरोग्य विभाग करणार लवकरच महाभरती
राज्यात आरोग्य विभाग करणार लवकरच महाभरती

ठळक मुद्देआरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी दिली माहिती राज्यात ५४ हजार २६३ पैकी १५ हजार २६४ जागा रिक्त आहेत.

बीड : राज्यातील आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याचे ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणले होते. याची शासनाने गंभीर दखल घेतली. आरोग्य विभागातील रिक्त पदांची महाभरती लवकरच पूर्ण करून आरोग्य सेवा बळकट करणार असल्याची माहिती प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी ‘लोकमत’ला दिली. एका प्रकरणाच्या चौकशीसाठी ते बीडमध्ये आले असता त्यांनी ही माहिती दिली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांसाठी आठवडाभरात मुलाखती घेऊन त्यांना पदस्थापना देणार असल्याचेही डॉ.व्यास म्हणाले.

महाराष्ट्रात ५४ हजार २६३ पैकी १५ हजार २६४ जागा रिक्त आहेत.  यामध्ये वर्ग १ च्या १०८७ तर गट अ वर्ग २ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ७७८९ पैकी १६३९ जागा रिक्त आहेत. ही बाब ‘लोकमत’ने ११ जुलै रोजी ‘प्रभारीराजमुळे राज्याची आरोग्य यंत्रणा आजारी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून समोर आणली होती. त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक डॉ.अनुपकुमार यादव यांनी तात्काळ पत्र काढून ८७७ जागा भरण्याच्या सुचना दिल्या. यासाठी पात्र असलेल्या २९९१ उमेदवारांची गुणवत्ता यादीही तयार केली आहे. 

प्रभारीराजमुळे राज्याची आरोग्य यंत्रणाच पडली आजारी

दरम्यान, इतर वर्ग १ ते ४ पर्यंतच्या रिक्त पदांबाबत प्रधान सचिव डॉ.व्यास म्हणाले, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागांसाठी आठवडाभरात समुपदेशन करून मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तसेच वर्ग २ व ३ च्या जागा भरण्यासाठी महाभरती केली जाणार आहे.  उपसंचालक व ग्रामविकास विभागामार्फत या जागा भरल्या जातील, असेही डॉ.व्यास यांनी बोलताना सांगितले. यावेळी सोबत विधान परिषदेचया उपसभापती आ.डॉ.निलम गोºहे, विद्या चव्हाण, प्रा.शिल्पा नाईक, लातुरचे आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार आदींची उपस्थिती होती.
 

राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना बुरे दिन; वर्ग एकच्या १०८७ जागा रिक्त

‘लोकमत’च्या वृत्तानंतर पदभरतीच्या हालचाली
राज्यात सार्वजनिक विभागाच्या रिक्त पदांबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर आगोदर ८७७ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदभरतीचा प्रश्न मार्गी लागला. आता वर्ग १ ते ४ पर्यंतच्या जागा भरण्याच्या कारवाईलाही वेग दिला जाणार आहे. प्रधान सचिवांनी तसे जाहीरपणे सांगितले.

महिनाभरात होणार पदोन्नत्या
हजारो जागा रिक्त असताना आणि ३ हजारपेक्षा जास्त डॉक्टर पात्र असतानाही पदोन्नती दिल्या जात नसल्याचे ‘लोकमत’ने समोर आणले होते. यावर बोलताना प्रधान सचिव डॉ.व्यास म्हणाले, पात्र डॉक्टरांचे कामांचा तपशील आणि सर्व अहवाल मागविण्यात येत आहेत. हे काम प्रगतीपथावर आहे. महिनाभरात पदोन्नत्या दिल्या जातील. सामान्य प्रशासन विभागामार्फत सर्व कारवाई केली जाईल. दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून  पदोन्नतीची प्रक्रिया रखडली होती. लोकमतने आवाज उठविल्यामुळे या प्रक्रियेस वेग मिळाला आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

प्रभाव लोकमतचा : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांचा प्रश्न मार्गी

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांसाठी गुणवत्ता यादी दिली आहे. समुपदेशनाची तारीख देऊन आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण करू. वर्ग ३ व ४ ची पदभरती ग्रामविकास विभागांतर्गत होते. हे सर्व पदे भरण्यात येतील. तसेच अहवाल मागवून सर्व पदोन्नत्यांचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावला जाईल.
- डॉ.प्रदीप व्यास, प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य


Web Title: Impact of Lokmat: Health Department will soon make a grand appointments in state
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.