मी पॉझिटिव्ह, मला धाप लागतेय, ॲडमिट व्हायचंय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST2021-06-04T04:25:41+5:302021-06-04T04:25:41+5:30
रिॲलिटी चेक बीड : ‘मी पॉझिटिव्ह आहे. मला खूप धाप लागत आहे. मला ॲडमिट करून घ्या. कागदपत्रे माझ्याकडे नाहीत,’ ...

मी पॉझिटिव्ह, मला धाप लागतेय, ॲडमिट व्हायचंय
रिॲलिटी चेक
बीड : ‘मी पॉझिटिव्ह आहे. मला खूप धाप लागत आहे. मला ॲडमिट करून घ्या. कागदपत्रे माझ्याकडे नाहीत,’ असे म्हणताच कागदपत्रांची विचार न करता एका सिस्टरने तत्काळ ऑक्सिजन लेव्हल तपासली; तर दुसऱ्याने नोडल ऑफिसरला फोनवरून कल्पना दिली. यावरून कागदपत्रांपेक्षा आलेल्या रुग्णाला तत्काळ सेवा दिली जात असल्याचे स्पष्ट झाले. आयटीआय डीसीएचसीमध्ये ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिॲलिटी चेक’मधून हा प्रकार समोर आला.
जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन खाटा कमी पडत असल्याने आयटीआयमध्ये २०० खाटा तयार केल्या. एप्रिल महिन्यात बाधितांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात होती; परंतु मागील आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी झाल्याने सर्वच निवांत झाले होते. हाच धागा पकडून गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आयटीआयमध्ये डमी रुग्ण बनून प्रवेश करण्यात आला. येथे उपस्थित डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मी पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. त्यांनी कागदपत्रांची विचारणा केली; परंतु मी आताच चाचणी केली असून, माझ्याकडे काहीच नाही; परंतु मला खूप धाप लागतेय, मला उपचार सुरू करा, असे सांगितले. एकाने येथे थेट ॲडमिशन केले जात नाही. तरी पण एकदा नोडल ऑफिसरला विचारतो, असे म्हणत फोन केला. तोपर्यंत एका नर्सने ऑक्सिजन लेव्हल तपासली. ती ९८ भरली. तोपर्यंत हा प्रकार डॉक्टरांना सांगण्यात आला. एका गंभीर रुग्णावर उपचार करून डॉक्टर धावत आले; परंतु त्यांना खरा प्रकार समजल्यावर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
नोडल ऑफिसर सहा मिनिटांत दाखल
या प्रकरणाबाबत नोडल ऑफिसर डॉ. संतोष शहाणे यांना माहिती देण्यात आली. ते सहा मिनिटांत आयटीआयमध्ये दाखल झाले. तसेच या सेंटरमधील परिचारिकांच्या प्रमुख स्वाती माळी यादेखील उपस्थित होत्या. यावरून येथील यंत्रणा सतर्क असल्याचे दिसून आले.
--
सध्या २७ रुग्ण आहेत. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे, हे खरे आहे; परंतु रुग्णाकडे आम्ही दुर्लक्ष होऊ देत नाही. खाटा रिकाम्या असल्यावर अगोदर उपचार करण्याकडे लक्ष देतो. कागदपत्रांपेक्षा आम्हाला रुग्ण महत्त्वाचा आहे. आमची सर्व टीम जबाबदारीने काम करते. काही त्रुटी असल्यास निदर्शनास आणून द्या, त्या तत्काळ दुरुस्त केल्या जातील.
- डाॅ. संतोष शहाणे, नोडल ऑफिसर, आयटीआय सेंटर