घाटनांदूर येथे बेकायदा गौण खनिजाचे उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST2021-09-04T04:40:24+5:302021-09-04T04:40:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे मोठ्या प्रमाणात शासकीय गायरान जमिनी आहेत. या गायरान जमिनीतून बेकायदा ...

घाटनांदूर येथे बेकायदा गौण खनिजाचे उत्खनन
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे मोठ्या प्रमाणात शासकीय गायरान जमिनी आहेत. या गायरान जमिनीतून बेकायदा गौण खनिजाचे उत्खनन होत आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
घाटनांदूर परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामे सुरू आहेत. या रस्त्याच्या कामासाठी लागणारा मुरूम, दगड, खडी चक्क गायरानातून उपसला जात आहे. संबंधित रस्त्याचे टेंडर घेणारे ठेकेदार, स्थानिक पुढारी त्यांच्या बगलबच्च्यांना सोबत घेऊन आपला कार्यभाग साधत आहेत. घाटनांदूर येथील महादेवपट्टी भागात मोठ्या शासकीय गायरान जमीन शिल्लक आहे. काही भागात वनविभागाने वृक्ष लागवड करून पर्यावरण संतुलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचे बेकायदा उत्खनन होत आहे. पिंपळा-अहमदपूर, परळी-घाटनांदूर-फावडेवाडी, घाटनांदूर -लिंबगाव-बर्दापूर याव्यतिरिक्त अनेक गावांना जोडणा-या रस्त्यांची कामे सुरू आहेत. सर्वांत खास बाब म्हणजे राष्ट्रीय महामार्ग योजनेचे काम करणारे कंत्राटदार जागा भाड्याने घेऊन स्वतःचा प्लँट टाकून साहित्य पुरवितात. यात स्थानिक पुढारी संबंधित कंत्राटदाराशी साटेलोटे करीत गायरान जमिनीलगत असलेली जागा प्लँटसाठी देतात. यात खासगी अर्धा एकर जागा आणि गायरान जमीन उत्खननासाठी वापरली जात आहे. या शासकीय जमिनीतून मोठया प्रमाणात मुरूम, दगड, खडीचा उपसा करण्यात येत आहे. याबाबतच घाटनांदूरचे महसूल मंडळ अधिकारी अंबाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
...
या जागेतील एका खदाणीला परवानगी आहे. याव्यतिरिक्त कोणी गौण खनिजाचा उपसा करीत असेल तर निश्चितपणे करवाई केली जाईल.
बिपीन पाटील, तहसीलदार.
....