वीज चोरीकडे दुर्लक्ष, मात्र अधिकृत ग्राहकांकडून सक्तीने वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:33 IST2021-03-18T04:33:51+5:302021-03-18T04:33:51+5:30
केज : शहरासह तालुक्यातील विद्युत ग्राहकांनी वापरलेल्या विजेची विद्युत मीटरमधून रीडिंग न घेताच ग्राहकांना अवाजवी वीज बिले दिल्याच्या ...

वीज चोरीकडे दुर्लक्ष, मात्र अधिकृत ग्राहकांकडून सक्तीने वसुली
केज : शहरासह तालुक्यातील विद्युत ग्राहकांनी वापरलेल्या विजेची विद्युत मीटरमधून रीडिंग न घेताच ग्राहकांना अवाजवी वीज बिले दिल्याच्या तक्रारी येत असून सक्तीने वसुली केली जात आहे. तर शहरासह तालुक्यात चोरुन वीज वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस वीज कंपनी करत नसल्याने चित्र केज शहरासह तालुक्यात दिसून येत आहे.
केज शहरातील अधिकृत वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनी डोकेदुखी ठरू लागली आहे. ग्राहकांच्या वीज मीटरची रीडिंग न घेताच रीडिंग उपलब्ध नाही असा शेरा मारत वीज ग्राहकांना चुकीच्या रीडिंग टाकून वीज बिले दिली जात आहेत. चुकीच्या पद्धतीने दिलेल्या वीज बिलाची माहिती वीज कंपनीच्या कार्यालयात देऊनही त्याची दखल घेतली जात नसून बिल देखील दुरुस्त केले जात नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
अधिकृत ग्राहकांकडून सक्तीने वसुली केली जात असताना शहरासह तालुक्यात वीज चोरी करणाऱ्यांकडून वीज कंपनीचे कर्मचारी आर्थिक तडजोड करत कोणतीही कारवाई करत नसल्याचे चित्र दिसून येत असल्याने अधिकृत वीज ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे. अधिकृत ग्राहकांच्या माथी झालेल्या वीज चोरीचा भार टाकण्यात येत आहे. वीज मंडळाची हिटलरशाही चालू असल्याचे चंद्रकला नाईकवाडे यांनी लोकमतला सांगितले.