नळ योजनेमुळे हातपंपांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:46 IST2021-01-08T05:46:47+5:302021-01-08T05:46:47+5:30
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी शासनाच्या वतीने गावोगावी हातपंप बसविण्यात आले. पूर्वी या हातपंपावर संपूर्ण गावाला ...

नळ योजनेमुळे हातपंपांकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी शासनाच्या वतीने गावोगावी हातपंप बसविण्यात आले. पूर्वी या हातपंपावर संपूर्ण गावाला पाणी मिळत असे. मात्र, आता गावोगावी पाणीपुरवठा योजना झाल्याने हातपंप नादुरुस्त अवस्थेत आहेत. भारनियमनाच्या कालावधीत आजही अनेक गावांना हातपंपांचा आधार मिळतो. त्यामुळे नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
पोलिसांसमोरच अवैध वाहतूक
बीड : शहरातील अण्णा भाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर नाका या भागात वाहतूक शाखेच्या पोलिसांसमोरच अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. रिक्षा, जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
धारूर डोंगरपट्ट्यात पक्षी-प्राणी वाढले
धारूर : तालुक्यात डोंगराळ भागात पाणी साठे व तलावाची संख्या वाढल्याने पक्षी-प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दाणापाणी मुलबक उपलब्ध होत असून पाणी साठ्याच्या बाजूला त्यांची रेलचेल वाढली असून, दुर्मिळ असणारे काही प्राणी, पक्षी या भागात दिसून येत आहेत. त्यांच्या रक्षणासाठी वन विभागाने प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
पार्किंग कोलमडली
अंबाजोगाई : शहरातील प्रमुख मार्गावरील पार्किंग व्यवस्था कोलमडली असल्याने कोंडी होत आहे. या कोंडीमुळे अनेकवेळा वाहनधारकांना पंधरा-पंधरा मिनिटे कोंडीत अडकून पडावे लागत आहे.
डासांचे प्रमाण वाढले
अंबाजोगाई : शहर व नव्याने विकसित होत असलेल्या सिल्वरसिटी परिसरात अद्याप नाल्याचे बांधकाम न झाल्याने रस्त्यावर पाणी साचते. रिकाम्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचे डोह साचल्याने मोठ्या प्रमाणात डास झाले आहेत. याचा त्रास रहिवाशांना होत आहे.
मजुरांची शोधाशोध
अंबाजोगाई : तालुक्यात सध्या कापूस वेचणी, उसाची लागवड, सोयाबीनची सोंगणी व रब्बीच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. ही कामे शेतीत मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने मजुरांची चणचण शेतकऱ्यांना भासत आहे.
योजनेला हरताळ
अंबाजोगाई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून गावोगावी गरीब लाभार्थींना अन्न पुरवठा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून होतो. पुरवठा होत असलेला गहू, तांदूळ हा हलक्या दर्जाचा आहे. अशा तक्रारी सातत्याने करूनही याकडे लक्ष दिले जात नाही.
विजेचा लपंंडाव
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने वीज प्रवाह खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. तसेच याचा मोठा फटका छोटे व्यापारी, व्यावसायिक यांना सहन करावा लागत आहे.