टीव्हीसमोर बसून जेवण करत असाल तर सावधान! पोटाचे विकार वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:37+5:302021-06-17T04:23:37+5:30

बीड : बदलत्या जीवनशैलीत सुखासनात बसून जेवण करण्याची पद्धत कालबाह्य होत चालली असून, खुर्चीवर बसून टीव्ही पाहत जेवण करणाऱ्यांचे ...

If you are eating while sitting in front of the TV, beware! Fear of growing stomach disorders | टीव्हीसमोर बसून जेवण करत असाल तर सावधान! पोटाचे विकार वाढण्याची भीती

टीव्हीसमोर बसून जेवण करत असाल तर सावधान! पोटाचे विकार वाढण्याची भीती

बीड : बदलत्या जीवनशैलीत सुखासनात बसून जेवण करण्याची पद्धत कालबाह्य होत चालली असून, खुर्चीवर बसून टीव्ही पाहत जेवण करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, असे जेवण भविष्यात पोटाच्या विकारांना निमंत्रण देऊ शकते. या बाबीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. भारतात जमिनीवर बसून जेवण करण्याची प्रथा चालत आली आहे. ज्या घरांमध्ये जेवण पारंपरिक पद्धतीने वाढले जाते, ते जमिनीवर बसून अन्न ग्रहण करतात. दिवसेंदिवस राहणीमान व जीवनमान बदलत गेल्याने जेवण करण्याच्या पद्धतीतही बदल होत गेले. सध्या अनेक लोक जमिनीवर बसून जेवण करत नाहीत, तर काही लोक टीव्हीवरील कार्यक्रम पाहत किंवा एका हाताने मोबाईल हाताळत किंवा पलंगावर बसून जेवण करणे पसंत करतात. हे आरामदायक वाटत असले तरी पचनाच्या दृष्टीने सुसंगत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनामुळे मागील १५ महिन्यांपासून मुले घरातच आहेत. त्यामुळे त्यांचा स्क्रीनटाईम वाढला आहे. टीव्ही किंवा मोबाईल पाहत जेवण करण्याकडे कल वाढला आहे. मनोरंजन होत असल्याने व जेवण करत असल्याने पालकही शांत असतात. मात्र, अशा प्रकारे जेवणामुळे पोटविकारांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. वेळीच सावध होऊन पालकांनी मुलांच्या जेवणाकडे व त्यांच्या आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे.

-------------

टीव्हीसमोर किंवा मोबाईल घेऊन जेवण्यापेक्षा भारतीय संस्कृतीनुसार मांडी घालून कुटुंबासोबत जेवणे महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीने जेवणामुळे आपली मुले किती आहार घेतात तसेच योग्य पद्धतीने व प्रमाणात व्यवस्थित जेवण करतात की नाही हे पालकांच्या लक्षात येईल. त्याचबरोबर त्याची आवड-निवड हेदेखील कळेल. मुलांच्या आहारावर नियंत्रण करता येईल. संभाव्य विकारही टळतील. - डॉ. गुरुप्रसाद राऊत, बीड.

-----

जेवताना अन्नपदार्थाचा रंग, वास पाहून मनामध्ये पचविण्यासाठी लाळ तयार होत असते. टीव्ही पाहिला तर ही लाळ तयार होणार नाही. टीव्ही पाहताना मुलांच्या खाण्यावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे शरीराची जाडी वाढते आणि पचनाचे विविध त्रास उद्भवतात. हे टाळण्यासाठी घरातल्या सगळ्यांनी एकत्र जेवले पाहिजे. ‘फॅमिली डिनर’मुळे मुलांच्या आहारावर नियंत्रण राहील. - डॉ. अनुराग पांगरीकर, बीड.

पोटविकाराची कारणे

टीव्हीसमोर बसणाऱ्या मुलांचे जेवणावर लक्ष नसते. आहार पूर्णपणे चाऊन खात नाहीत. अपचन होते. पित्ताचे विकार वाढतात. आतड्याची पचनक्रिया बिघडल्याने अल्सर, बद्धकोष्ठता, मूळव्याध असे आजार जडू शकतात. मेदाचे प्रमाणही वाढते. डायनिंग टेबलवर जेवण केल्याने खाण्याची गती बिघडते. यामुळे पोट आणि मेंदूला तृप्तीची जाणीव हाेत नाही. गरजेपेक्षा जास्त जेवण केल्याने पोट सुटते. शिवाय अपचन, जळजळ, पोटासंबंधित विकार जडतात. मैद्याचे पदार्थ, तेलकट, तुपकट, आंबट, तिखट प्रमाणात न खाल्ल्याने पचनक्रिया सुलभ होत नाही.

-------------

मुले टीव्हीसमोर बसून जेवण करतात. होईल तेवढे टाळण्याचा प्रयत्न आम्ही करतो. कधी मोबाईल, तर कधी टीव्ही पाहत त्यांचे जेवण असते. मोबाईल देण्याचे अनेकदा टाळते. मुलांना पोट दुखणे ,पचनाचा त्रास लक्षात येताच त्यांच्या आहारावर लक्ष केंद्रित केले. टीव्ही बंद करून जेवणास बसविले जाते. - ऐश्वर्या दत्तात्रय बरकसे, बीड.

---------

आधीच मोबाईल आणि टीव्हीमुळे अभ्यासावरचे लक्ष राहिलेले नाही. मुले मोबाईल बघत किंवा टीव्ही पाहत जेवण करतात. जेवायला वेळही लावतात. जेवण पोटभर करतात. मात्र, कधीकधी प्रमाण लक्षात येत नाही. टीव्ही बंद करून धाक दाखवून जेवणासाठी बसविले जाते. मात्र, रोज धाक लावणे जमत नसते, नमते घ्यावे लागते. - राधिका लक्ष्मीकांत बियाणी, बीड.

----------

टीव्हीसमोर मुलांनी जेवण करू नये म्हणून आमचे नेहमी प्रयत्न असतात. लॉकडॉऊनमुळे मुलांची दिनचर्याच बदललेली आहे. दुसरा काही पर्याय नसल्याने टीव्हीवर मनोरंजन कार्यक्रम पाहत जेवण करतात. मात्र असे रोज नसते. आम्ही सर्व कुटुंब एकत्रित जेवण करून आनंद घेतो. - वंदना अमोल विप्र, बीड.

---------

पोटविकार टाळायचे असेल तर

सुखासनात बसल्यास जेवणावर लक्ष केंद्रित राहते, मेंदू शांत राहतो. पोटावर दबाव न पडता पाचन क्रिया व्यवस्थित राहते. खाण्यात आणि अन्न पचवण्यास मदत होते. जमिनीवर बसून जेवण केल्यास होणाऱ्या हालचालींमुळे पोटातील मांसपेशी सक्रिय होतात. त्यामुळे अन्न सहज पचते. जमिनीवर बसून जेवणे फायदेशीर असून, पोटाचे विकार होत नाही.

----------

Web Title: If you are eating while sitting in front of the TV, beware! Fear of growing stomach disorders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.