गाव तेथे एसटी सुरू केल्यास प्रवाशांची लूट थांबेल - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:31 IST2021-08-29T04:31:42+5:302021-08-29T04:31:42+5:30
शिरूर कासार : तालुक्यातील ग्रामीण भागात असलेली गावखेडी दळणवळणाच्या माध्यमातून जोडण्यासाठी पाटोदा ते चकलांबा मुक्कामी बस सुरू करून, गाव ...

गाव तेथे एसटी सुरू केल्यास प्रवाशांची लूट थांबेल - A
शिरूर कासार : तालुक्यातील ग्रामीण भागात असलेली गावखेडी दळणवळणाच्या माध्यमातून जोडण्यासाठी पाटोदा ते चकलांबा मुक्कामी बस सुरू करून, गाव तेथे एसटी असा खेडेजोड उपक्रम राज्य परिवहन महामंडळाने हाती घेण्याची मागणी भाजप तालुकाध्यक्ष डॉ.मधुसूदन खेडकर यांनी पाटोदा आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे, अन्यथा खासगी वहातूकदारांकडून प्रवाशांची अर्थिक लूट सुरूच राहील, असे खेडकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. सदरील बससेवा पाटोदा, शिरूर, सावरगांव, तिंतरवणी, शिंगारवाडी फाटा, तरडगव्हाण मार्गे, चकलांबा मार्गे सुरू करावी, जेणेकरून प्रवाशांसह नागरिकांच्या दृष्टीने ते सोयीचे होईल. ग्रामीण भागातील नागरिकांना शिरूर किंवा पाटोदा येथे आपल्या शासकीय कामांसाठी जाण्याची गरज पडते. अशा नागरिकांसाठी ही बससेवा सोयीची राहणार आहे, शिवाय वेळेची आणि अंतराची बचत होऊन, एका दिवसात काम करून घरी परतणेही शक्य होणार आहे. महामंडळाच्या उत्पन्नाच्या दृष्टीनेही या बससेवेचा फायदा होणार असून, गरीब जनतेसह प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे. त्यामुळे एस.टी.महामंडळाच्या पाटोदा आगाराने याचा विचार करून, लवकरात लवकर ग्रामीण भागात बससेवा सुरू करून, ग्रामीण प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी खेडकर यांनी केली आहे.