NCP Dhananjay Munde: भगवानगडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे हे आज दुपारी शिरूर कासार येथे जाणार होते. परंतु धनंजय मुंडेंचा हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. काही तांत्रिक कारणांनी मुंबईतून विमान उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने जड अंतःकरणाने हा दौरा रद्द करावा लागत असल्याचा खुलासा मुंडे यांच्याकडून करण्यात आला आहे.
दौरा रद्द करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "मी पिंपळनेर (ता. शिरूर कासार) येथील संत श्री भगवानबाबा यांच्या परंपरेतील नारळी सप्ताहात येण्यासाठी सकाळी साधारण दहा वाजल्यापासून मुंबई येथील पवन हंस विमानतळावर आहे. मात्र काही तांत्रिक कारणांनी अजूनही उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने माझा आजचा पिंपळनेर (शिरूर कासार) दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे. अध्यात्मिक कार्यक्रमास आपल्यामुळे विलंब नको म्हणून याबाबत आदरणीय शास्त्री बाबांना कल्पना दिली आहे," अशी माहिती मुंडे यांनी दिली आहे.
दरम्यान, "दौरा रद्द करावा लागल्याबद्दल मी श्री क्षेत्र भगवानगड, आदरणीय महंत न्यायाचार्य ह.भ.प. डॉ. नामदेव महाराज शास्त्री तसेच समस्त पिंपळनेरच्या रहिवाशांची हृदयपूर्वक क्षमा मागतो," असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
सुरेश धस यांच्यासोबत एकत्रित दिसण्याची होती चर्चा केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर भाजप नेते आणि आमदार सुरेश धस विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष निर्माण झाला. देशमुख हत्या प्रकरणासह बीड जिल्ह्यातील इतर गुन्हेगारी घटनांवरून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर अनेक घणाघाती आरोप केले. आमदार धस यांनी केलेले आरोप आणि सरपंच हत्या प्रकरणात आढळलेला निकटवर्तीयांचा सहभाग यामुळे मुंडे यांनी आपलं मंत्रिपद सोडावं लागलं. या राजकीय संघर्षानंतर आज पहिल्यांदाच धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोन्ही नेते सार्वजनिक कार्यक्रमात एकत्रित दिसण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र धनंजय मुंडे यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आल्याने या चर्चेलाही आता पूर्णविराम मिळाला आहे.