पत्नीच्या त्रासास कंटाळून पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:01 IST2019-02-06T00:00:43+5:302019-02-06T00:01:57+5:30
पत्नी, मेहुणी आणि सासरा यांच्या त्रासाला कंटाळून अवघ्या चार वर्षांपूर्वी लग्न झालेल्या अण्णासाहेब प्रभाकर सुरवसे (वय २८, रा. मथुरा नगर, परळी) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पत्नीच्या त्रासास कंटाळून पतीची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पत्नी, मेहुणी आणि सासरा यांच्या त्रासाला कंटाळून अवघ्या चार वर्षांपूर्वी लग्न झालेल्या अण्णासाहेब प्रभाकर सुरवसे (वय २८, रा. मथुरा नगर, परळी) याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मथुरानगर येथे राहणारा अण्णासाहेब परळी औष्णिक विद्युत केंद्रात नोकरी करत होता. चार वर्षापूर्वी लातूर जिल्ह्यातील येळी येथील दिलीपराव मोजिते यांची मुलगी पूजासोबत त्याचे लग्न झाले होते. या दांपत्यास दीड वर्षाची एक मुलगी आहे. काही कार्यक्रमानिमित्त पूजा तिच्या मुलीस घेऊन एक महिन्यापूर्वी माहेरी गेली होती. २५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता अण्णासाहेब यांची आई पूजाला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेली होती तर वडील पोथी ऐकण्यासाठी गेले होते. तर रात्रपाळी करून आलेला अण्णासाहेब विश्रांतीसाठी स्वत:च्या खोलीत झोपला. काही वेळानंतर अण्णासाहेब यांच्या भावजयीने खोलीचा दरवाजा वाजवून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, काहीच प्रतिसाद न आल्याने त्यांनी आरडाओरडा करून सर्वांना बोलावून घेतले. दरवाजा तोडला असता अण्णासाहेब यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अण्णासाहेब यांच्या कपड्यांची झडती घेतली असता त्यात मृत्युपूर्वी लिहिलेली चिट्ठी सापडली. पत्नी पूजा, मेहुणी अलका पाखरे आणि सासरे दिलीप मोहिते यांच्याकडून सतत होणाºया त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आढळून आला. याबात अण्णासाहेबचे वडील प्रभाकर सुरवसे यांच्या तक्रारीवरून पूजा, अलका पाखरे व दिलीप मोहिते या तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला.