शिरुर कासार येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:32 IST2020-12-29T04:32:04+5:302020-12-29T04:32:04+5:30
शिरूर कासार : कोरोना या महामारीच्या संक्रमण काळात जिवाची पर्वा न करता रूग्ण सेवेत खंड न पडू देता ...

शिरुर कासार येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान
शिरूर कासार : कोरोना या महामारीच्या संक्रमण काळात जिवाची पर्वा न करता रूग्ण सेवेत खंड न पडू देता हजारो रूग्ण तपासले व उपचार केले. हे करत असतानाच प्रशासनाच्या हातात हात घालून सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या खऱ्या योध्द्यांची दखल घेत प्रशासनाने त्यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित केले.
शहरात पन्नास वर्षांपासून वैद्यकीय सेवा करणारे डॉ. रमणलाल बडजाते तसेच त्यांचे अख्खे कुटुंबच वैद्यकीय सेवेत कार्यरत आहे. बडजाते यांनी आपल्या दवाखान्याचे दरवाजे सताड उघडे ठेवले. रात्री - अपरात्री आलेल्या रुग्णांना तपासून उपचार सुरूच ठेवले होते. दोन दिवसांपूर्वी तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या हस्ते कोरोना योध्दा म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले. डॉ .अनिल बडे, डॉ. शोभा सानप, डॉ. संतोष सानप यांनी रोग प्रतिरोधक आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे मोफत वाटप केल्याचा आवर्जुन उल्लेख बेंडे यांनी यावेळी केला.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी, नोडल ऑफिसर डॉ. शिवनाथ वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. संतोष शहाणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. किशोर खाडे, डॉ. सुहास खाडे यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशासेविका, शिक्षक, पोलीस आदींनी या काळात आपापली जबाबदारी निभावली असल्याचे बेंडे यांनी सांगितले. प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्थांनी एकत्रित येऊन काम केल्यास त्याची फलश्रुती मिळतेच हे दाखवून दिले, असे श्रीराम बेंडे यांनी सांगितले.