५० पेक्षा जास्त वय असलेले होमगार्ड्स बेरोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST2021-06-10T04:22:49+5:302021-06-10T04:22:49+5:30
बीड : कुठलीही आपत्ती किंवा संकट, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास गृहरक्षक दलातील जवानांची मदत घेतली जाते. तोकड्या ...

५० पेक्षा जास्त वय असलेले होमगार्ड्स बेरोजगार
बीड : कुठलीही आपत्ती किंवा संकट, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास गृहरक्षक दलातील जवानांची मदत घेतली जाते. तोकड्या मानधनावर हे जवान जिवाची बाजी लावून काम करतात. कोरोना महामारीच्या संकटात त्यांनी आपली सेवा दिली आहे. आता राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे ५० वर्षांवरील वयोगटात असलेल्या होमगार्डला ड्यूटी देऊ नये, हा अन्यायकारक आदेश लादला आहे.
शासनाच्या इतर विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रमाणे कुठलीही सुविधा होमगार्डला मिळत नाही. अन्यायाविरोधात बोलण्याची त्यांना मुभा नाही. गरज वाटेल तेव्हा या होमगार्डला कामावर बोलवायचे आणि नंतर विचारायचे नाही, असे शासनाचे धोरण आहे. हे प्रकार नेहमीच होतात. ठरल्याप्रमाणे रोजगार देणे बंधनकारक असताना तेवढे दिवस रोजगार मिळत नाही. तसेच केलेल्या कामाचा मोबदलाही वेळेवर दिला जात नाही, अशा परिस्थितीतही होमगार्ड प्रामाणिकपणे कर्तव्य बजावतात. मात्र, आता कोरोनाकाळात ५० वर्षे वयोगटावरील होमगार्डला रोजगार दिलेला नाही; तसेच काही अनुदानही देण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत.
जिल्ह्यातील नोंदणीकृत होमगार्डस १०९२
महिला होमगार्ड संख्या - ११८
५० पेक्षा जास्त वय असलेले - १६१
सध्या सेवेत असलेले - ७५०
आम्ही जगायचे कसे ?
१५ रुपये मानधन असल्यापासून होमगार्ड म्हणून सेवा दिली आहे. कर्तव्यात कधीही खंड पडू दिला नाही. आता कोरोनाचे नाव पुढे करून शासनाने आम्हांला कमी केले आहे. आमच्यावर हा मोठा अन्याय झाला असून, शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
- शेख रशीद शेख रहीम
१९९२ पासून सेवा देत आहे. आता वयाची पन्नाशी ओलांडल्यामुळे शासनाच्या निर्णयाप्रमाणे कर्तव्यावर घेतले नाही. मात्र, याचा परिणाम कुटुंबावर झाला असून, आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. राज्यातील अशा होमगार्डची संख्या जास्त आहे. याकडे शासनाने लक्ष देणेदेखील गरजेचे आहे.
रामनाथ लोखंडे
शासन निर्देशााप्रमाणे निर्णय
शासनाने गृहरक्षक दलातील जवानांसाठी नवे निर्देश दिले आहेत. त्यात ५० वर्षांवरील होमगार्डला ड्यूटी देऊ नये असा आदेश आहे. त्यानुसार कार्यवाही केली असून, ५० पेक्षा कमी वयोगटातील गरजेनुसार कर्तव्यावर आहेत.
सुनील लांजेवार, अप्पर पोलीस अधीक्षक, बीड