एचआयव्ही बाधितांच्या जुळल्या ‘रेशीमगाठी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:41 IST2019-04-26T00:40:56+5:302019-04-26T00:41:12+5:30
एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या जोडप्याच्या बीडमध्ये रेशीमगाठी जुळल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील विवाह निबंधक कार्यालयात हा सोहळा थाटात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

एचआयव्ही बाधितांच्या जुळल्या ‘रेशीमगाठी’
बीड : एचआयव्हीसारख्या दुर्धर आजाराने जडलेल्या जोडप्याच्या बीडमध्ये रेशीमगाठी जुळल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील विवाह निबंधक कार्यालयात हा सोहळा थाटात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
पाली (ता.बीड) येथील इन्फंट इंडिया या संस्थेतील १९ वर्षीय मुलीचा औरंगाबाद येथील मुलासोबत विवाह जुळला होता. जन्मत:च एचआयव्हीची लागण झालेली मुलगी २००७ साली या संस्थेत दाखल झाली होती. तेव्हापासून तिचा सर्व सांभाळ, शिक्षण आणि इतर गरजा संस्थेने भागविल्या. नुकताच आयोजित वधु-वर परिचय मेळाव्यात तिची ओळख औरंगाबादच्या मुलासोबत झाली. यातुन त्यांनी विवाह करण्याचा निश्चय केला. गुरूवारी विवाह निबंधक कार्यालयात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा सोहळा थाटात पार पडला. इन्फंटचे संचालक संध्या व दत्ता बारगजेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वºहाडी म्हणून उपस्थित रहात नवदाम्पत्यास शुभाशिर्वाद दिले.
मुलाला कंपनीत नोकरी
नवरदेव मुलाला औरंगाबाद येथे एका कंपनीत नोकरी आहे. या कंपनीमध्ये जेमतेम पगार असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह तो भागवतो. दोघेही एचआयव्ही बाधित असले तरी मुलाच्या कुटुंबियांनी मोठ्या मनाने त्यांना स्वीकारले आहे.
सामाजिक योगदान
नववधुला मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते अय्यद यांनी सोन्याचे डोरले घेतले. बीडचे गौतम खटोड व डॉ. अनिल बारकुल यांनी जेवणाची, मनोज अग्रवाल यांनी पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच साडी व इतर कपडे जालना येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले होते.
पाचवा विवाह सोहळा
इन्फंट इंडियामध्ये आश्रय घेतलेल्या पाच जोडप्यांचा आतापर्यंत विवाह सोहळा पार पडल्याचे संध्या व दत्ता बारगजे यांनी सांगितले. यापुढेही मुलांच्या म्हणण्यानुसार व स्थळ चांगले येताच विवाह लावून दिले जातील, असेही ते म्हणाले.